ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच, त्यापाठोपाठ आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या संदर्भात भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले. यापूर्वी २०२१ मध्ये बदलीचा आदेश दिल्यानंतरही महिनाभरात संबंधित कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागातच दाखल झाले होते, या कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी बदलीची कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

महापालिकेच्या वर्धापनदिनीच ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाखांची लाच घेताना पकडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यातून राज्यभरात ठाणे शहराची बदनामी झाली आहे. राज्यातील आघाडीचे शहर आणि महापालिकांमध्ये ठाणे शहराचा नावलौकिक होत असतानाच, पाटोळेंमुळे शहराच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला गेला, असे दुर्देवाने म्हणावे लागेल, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षांच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता आहे.

महापालिकेत अतिक्रमण विभागाप्रमाणेच शहर विकास, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्वाच्या पदांवरही काही अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. त्यांच्याही बदल्या करण्याची गरज आहे, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

अन्य विभागात बदली करावी

ठाणे महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली होती. मात्र, अवघ्या महिनाभरापेक्षा कमी काळात संबंधित १७० कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाले. या प्रकाराची आपण चौकशी करावी. तसेच सध्या ते १७० कर्मचारी कुठे काम करीत आहेत, याची आपण माहिती घ्यावी. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हितसंबंध निर्माण झाले असून, त्यामुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहे. या कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांची अन्य विभागात बदली करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

तांत्रिकदृष्ट्या बदलीनंतर पुन्हा मलिद्याच्या विभागात

ठाणे महापालिकेचा शहर विकास विभाग, घनकचरा विभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभाग `मलिदा’ मिळविणारे विभाग म्हणून ओळखले जातात. या विभागांमध्ये स्वत:चे संस्थान निर्माण केलेले काही अधिकारी आणि अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. तांत्रिकदृष्ट्या काही दिवसांसाठी दुसऱ्या विभागात बदली करुन पुन्हा अतिक्रमण आणि घनकचरा विभागात संबंधित अधिकारी व कर्मचारी रुजू होतात, असा आरोप नारायण पवार यांनी केला.

बढतीनंतरही मलिद्याच्या विभागातच कायम

ठाणे महापालिकेने २१ जुलै २०२५ रोजी कार्यालयीन अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदावर अनेक कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली. परंतु, अतिक्रमण विभाग, शहर विकास विभाग, घनकचरा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी बढती मिळूनही पूर्वीच्याच पदावर कायम आहेत. या कर्मचाऱ्यांना तत्काळ विभागातून मुक्त करावे, अशी मागणी माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.