सेवा रस्ते, अंतर्गत उड्डाणपुलासह विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे

ठाणे : गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, ठाणे शहरातील विविध भागातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खड्डे पडल्याचे चित्र आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या पायथ्याशी तसेच सेवा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ठाणे शहरातील रस्त्यांवर १ हजार ४४८ खड्डे पडले होते. त्यापैकी १ हजार ३१० खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरित १३८ खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक असल्याची बाब पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे. परंतु पालिकेच्या दाव्यापेक्षा शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या जास्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा गणेश मूर्तीचे आगमन खड्ड्यातून होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा : ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी नाही; महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद राहणार

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागू नये यासाठी पालिकेने पावसाळ्यापूर्वी कंबर कसली होती. शहरातील अनेक रस्त्यांसह अंतर्गत उड्डाण पूल आणि सेवा रस्त्यांची डागडुजी केली होती. ठाणे शहरातून जाणाऱ्या एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यानंतर पालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पालिकेकडून या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येते. मात्र, त्याचे पैसे अद्याप त्यांना मिळलेले नाहीत. यंदा या रस्त्यांवर खड्डे भरणीची वेळ येऊ नये म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना रस्ते सुस्थितीत ठेवण्याची सूचना केली होती. या विभागांनी खड्डे भरणीची कामे पावसाळ्यापूर्वी केली होती. परंतु पावसाळ्यात बुजवलेले खड्डे उखडल्याने कोंडीची समस्या निर्माण होत असून या विभागांकडून खड्डे भरणीची कामे अद्यापही सुरूच असल्याचे चित्र दिसून येते. असे असले तरी ठाणे शहरातील  अंतर्गत रस्त्यांवर फारसे खड्डे नव्हते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांसह सेवा रस्ते आणि अंतर्गत उड्डाण पुलाच्या पायथ्याशी खड्डे पडल्याचे चित्र आहे. गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असून शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने यंदा

गेल्या आठवडय़ात ठाणे शहरात १ हजार २०० च्या आसपास खड्डे असल्याची बाब पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली होती. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे खड्ड्यांच्या संख्येत २४८ ने वाढ झाली असून एकूण खड्ड्यांची संख्या १ हजार ४४८ इतकी झाली आहे. सर्वाधिक म्हणजेच ४०० खड्डे एकट्या दिवा भागात आहेत तर, त्याखालोखाल नौपाडा आणि वर्तकनगर भागात प्रत्येकी २०० खड्डे आहेत.  १ हजार ४४८ पैकी १ हजार ३१० खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरित १३८ खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक असल्याची बाब पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

काय ते रस्ते…

ठाणे येथील तिनहात नाका भागातील गुरुद्वाराजवळील सेवा रस्त्याला भगदाड पडले आहे. हा खड्डा दोन फुटांच्या आकाराचा आणि तितकाच खोल आहे. या मार्गावरून वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या खड्ड्यावरूनच कॉंग्रेसचे पदाधिकारी राहुल पिंगळे यांनी याठिकाणी फलक लावून प्रशासनाच्या कारभारावर टिका केली आहे. त्यात काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय ती वाहतुक कोंडी एकदम ओके असा मजकूर फलकावर लिहिण्यात आला आहे.