ठाणे : करोना या साथीच्या आजाराच्या काळात आलेला अनुभव लक्षात घेऊन भविष्यात उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी ठाणे महापालिकेने आता केंद्र सरकारच्या योजनेतून ‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ (एसएसयु) केंद्र उभारले आहे. साथरोग कोणत्या भागातून पसरली, साथ रोग कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे, अशी कामे या केंद्रात केली जाणार आहेत. ठाणे महापालिकेच्या देखरेखखाली केंद्राचे कामकाज चालणार असून हे केंद्र जिल्हा पातळीवर काम करणार आहे. येत्या २ ऑक्टोंबरपासून अंशत: हे केंद्र सुरू होणार आहे.

पावसाळ्यात विविध प्रकारचे साथ रोग पसरत असतात. परंतु सहा वर्षंपुर्वी करोनाची साथ पसरली होती. करोनाची साथ नवीन असल्यामुळे त्यावर उपचारही होत नव्हते. या साथीच्या आजाराच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकाने जिल्हा पातळीवर ‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ केंद्र उभारण्यास सुरूवात केली आहे. अशाचप्रकारे ठाणे जिल्ह्यातही हे केंद्र उभारण्यात आलेले आहे. या केंद्रासाठी ठाणे महापालिकेने जागा दिली असून या केंद्राची जबाबदारी ठाणे महापालिकेवर सोपविण्यात आलेली आहे. माजीवाडा भागात ठाणे महापालिकेची पाच मजली इमारती असून या इमारतीत करोना काळात पालिकेने कोवीडोत्तर केंद्र उभारले होते. करोना साथ संपल्यानंतर हे केंद्र बंद झाले होते. त्या जागेवर म्हणजेच, या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ हे केंद्र उभारले जाणार आहे.

चाचण्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे

‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ या केंद्राची उभारणी करण्यात आली असून येत्या २ ऑक्टोंबरपासून अंशत: हे केंद्र सुरू होणार आहे. असे असले तरी याठिकाणी काही कामे अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे ही कामेही टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहेत. त्यामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा बांधण्यात येणार असून यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी महापालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात विद्युत कामे, सौरउर्जा यंत्रणा, अग्निशमन कामे, एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट, मलनिस्सारण केंद्र यांचा समावेश आहे. त्यासोबतच बायो सेफ्टी लॅबोरेटरी (कॅटेगरी-२) चे बांधकाम, उपकरणे बसविणे आणि चाचणीसुद्धा करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेत अन्न, पाणी तपासणी, बॅक्टेरिऑलॉजी, व्हायरॉलॉजी, एंटोमॉलॉजी यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करता येणार आहेत.

मनुष्यबळाची भरती

‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ या केंद्राच्या मनुष्यबळासाठी ११ आणि १२ सप्टेंबर २०२५ रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. एकूण १७ प्रकारची तांत्रिक आणि तज्ज्ञ पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये सीनियर पब्लिक हेल्थ स्पेशॅलिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशॅलिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, व्हेटेरिनरी स्पेशॅलिस्ट, फूड सेफ्टी एक्स्पर्ट, एंटोमॉलॉजिस्ट, टेक्निकल ऑफिसर, रिसर्च असिस्टंट, डेटा अनालिस्ट, डेटा मॅनेजर आदी पदांचा समावेश आहे.

संभाव्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ तयार करण्यात आले असून यासाठी आवश्यक मनुष्यबळही घेण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून हे केंद्र उभारले असून त्याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. ठाणे महापालिकेच्या देखरेखखाली हे केंद्र ठाणे जिल्ह्यासाठी कार्यरत असणार आहे. – डाॅ. प्रसाद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका