महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली असून यामुळे पुढील चार दिवस शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी कपात झाल्याने ठाणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून २१० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी भातसा धरणाच्या पिसे बंधारा येथून पाणी उचलण्यात येते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी अचानकपणे कमी झाल्यामुळे महापालिकेला पुरेसा पाणी उचलणे शक्य होत नाही. या कारणांमुळे शहरामध्ये पुढील चार दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

का घटली पाण्याची पातळी?

या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी नेमकी कशामुळे कमी झाली? या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पिसे बंधाऱ्यातून संपूर्ण ठाणे शहरात पाणी पुरवठा करण्यात येतो. या बंधाऱ्यातून ५ ते १० टक्के कमी पाणी पुरवठा होत असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.