अंबरनाथ : लिफ़्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून पालेगाव भागात सोसायटीतील रहिवाशाने एका अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये बेदम मारहाण करत चक्क हाताला चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना लिफ़्टमधील सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी विकृत रहिवासी कैलास तनवाणी याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कैलास याच्या पत्नीनेही या घटनेनंतर कोटुंबिक वादातून कैलास विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील पटेल जियम सोसायटी आहे. या सोसायटीत ४ जुलै रोजी एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जात असताना यावेळी लिफ्टमध्ये याच सोसायटीतील रहिवासी कैलास तनवाणी आला. मात्र यावेळी लिफ्टचा दरवाजा बंद करत असल्याच्या रागातून कैलास याने त्या अल्पवयीन मुलाला तू मोहित का दोस्त है ना? अशी विचारणा करत थेट या मुलाला मारहाण करत त्याच्या पाच वेळा कानशिलात लगावली. त्यामुळे या लहानग्यांने बचावासाठी आपला हात पुढे घेतला असता या विकृताने त्याच्या हाताचाही चावा घेतला. यावेळी लिफ्टमधील एक महिला या मुलाचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत केला. त्यानंतरही या विकृताने तुला आता लोकांनी वाचवले नंतर बाहेर भेट तुला चाकूने मारेल अशी धमकी या मुलाला दिली. तर मारहाण करतांना कैलासच्या हातात चावी आणि मोबाईल असल्याने या लहानग्याला अंतर्गत दुखापत झाली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र मारहाणीचा हा सगळा प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
तर याबाबत मुलाच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य न बाळगता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा पालकांनी आरोप केला आहे. मात्र पालकांच्या पाठपुराव्या नंतर कैलास याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही बघितल्या नंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेनंतर कैलास याच्या पत्नीने ही कोटुंबिक वादातून त्याच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास करत असून आरोपीला देखील चौकशीसाठी बोलवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.