ठाणे – राज्य शासनाकडून विविध राबविलेल्या योजना आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती यामुळे ठाणे एसटी विभागाने गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत उत्तम अर्थार्जन केले आहे. प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसेच एसटीच्या वाढविण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात सुमारे वार्षिक २४० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वार्षिक अहवालातून ठाणे एसटी विभागाच्या वार्षिक उत्पन्नाबाबत माहिती देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या जनहितकारी योजना, प्रवाशांना मिळालेल्या सवलती, तसेच एसटी महामंडळाच्या धोरणात्मक निर्णयांचा ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नावर मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. करोना महामारीनंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने उभारी घेण्यासाठी घेतलेली पावले आता फलद्रूप होत असल्याचे संकेत मिळत आहेत. शासनाच्या महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत, विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे पास, ज्येष्ठ नागरिक व अपंग प्रवाशांना दिलेल्या सवलती आणि ग्रामपातळीपर्यंत वाढविण्यात आलेल्या एसटी सेवा यामुळे प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत एसटीच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली.

ठाणे एसटी विभागात आठ मुख्य आगार असुन येथून दररोज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या गाड्या जातात. खासगी वाहतुकीच्या तुलनेत येथील प्रवास भाड्याचे दर अत्यंत कमी असल्याने प्रवासी देखील या गाड्यांमधून प्रवास करण्यास पसंती देतात. तसेच गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आरक्षण, समूह आरक्षण, एसटी तुमच्या दारात, सणोत्सवासाठी आगाऊ आरक्षण तसेच प्रवाशी संख्या जास्त असल्यास त्यांच्या मागणीनुसार थेट त्यांच्या निश्चित स्थळी गाडी नेणे यांसारख्या अनेक उपायोजना ठाणे एसटी विभागाने प्रामुख्याने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत सातत्याने राबविल्या आहेत. यामुळे गणेशोत्सव, होळी, दिवाळी तसेच मे महिन्याचा शालेय सुट्ट्यांचा कालावधी या दरम्यान एसटी विभागाने उत्तम पद्धतीने नियोजन करुन प्रवासी संख्येत वाढ केली आणि त्याचे सकारात्मक परिणाम हे विभागाच्या आर्थिक उत्पानांवर दिसून आले.

ठाणे एसटी विभागात ठाणे शहरात दोन आगार, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर, वाडा हे आठ मुख्य आगार आहेत. येथून नियमित बस राज्यातील विविध ठिकाणी प्रवासी करतात.

वर्ष २०२२

प्रवासी संख्या – ६३ हजार ( दैनिक सरासरी )

वार्षिक उत्पन्न – १०२ कोटी ४० लाख

प्रतिदिन सरासरी किमी प्रवास – ०.७५

वर्ष – २०२३

प्रवासी संख्या – १ लाख ५२ हजार ( दैनिक सरासरी )

वार्षिक उत्पन्न – २५५ कोटी १३ लाख ५८ हजार

प्रतिदिन सरासरी किमी प्रवास – १ लाख ५५ हजार

वर्ष – २०२४

प्रवासी संख्या – १ लाख ६७ हजार (दैनिक सरासरी)

वार्षिक उत्पन्न – ३४२ कोटी ३० लाख ५७ हजार

प्रतिदिन सरासरी किमी प्रवास – १ लाख ७६ हजार