ठाणे : मागील सहा महिने बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा ठाण्यात पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांचा विरोध वाढू लागला असून या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी जनतेला अपेक्षित बदल केल्याशिवाय ही सेवा सुरू करण्यात येणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती केळकर यांनी दिली.

मागील सहा महिने बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा ठाण्यात पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांचा विरोध वाढू लागला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी देखील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांची भेट घेतली होती. नागरिकांनी याबाबत आपली कैफियत आमदार संजय केळकर यांच्याकडे मांडल्यानंतर केळकर यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना फोन करून टोईंग व्हॅन सेवेवर प्रश्न उपस्थित केले. या सेवेचा नागरिकांना विशेषतः दुचाकीस्वारांना वाईट अनुभव आहे. या सेवेचे काम पारदर्शक नाही. नागरिकांना सेवेऐवजी त्रासच अधिक होतो, शिवाय दुजाभावही होतो. हे बदल केल्याशिवाय ही सेवा सुरू करण्यात येऊ नये, अशी नागरिकांची मागणी केळकर यांनी यावेळी केली. त्यावर आयुक्त डुंबरे यांनी नागरिकांना अपेक्षित बदल करूनच या सेवेची अंमलबजावणी करण्यात येईल. नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शास्त्रशुद्ध आणि पारदर्शक योजना तयार करू, तोपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले.

ही सेवा नागरिकांच्या आजवरच्या अनुभवानुसार वादग्रस्त असून वाहनचालकांच्या तक्रारी असतात. एकीकडे जनतेचे म्हणणे रास्त असताना दुसरीकडे प्रशासनही त्यांच्या योजनेसंदर्भात म्हणणे मांडत असते. नागरिकांच्या वाहतुकीसंदर्भात तक्रारी सोडवण्यासाठी मी नियमितपणे वाहतूक विभागाशी सुसंवाद ठेवून आहे. अनेक त्रासदायक योजना किंवा निर्णय मागे घेण्यासाठी प्रशासनाला भाग पाडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असतो. टोईंग व्हॅनबाबतच्या नागरिकांच्या तक्रारीनुसार शनिवारी आयुक्तांशी चर्चा केली असून तक्रारीनुसार आवश्यक आणि अपेक्षित बदल केल्याशिवाय ही सेवा सुरू करण्यात येणार नसल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे केळकर यांनी सांगितले.