ठाणे – ठाणे वाहतूक विभागातील एका पोलिस शिपायालाच गेल्या आठवड्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांनी आपल्या मित्राची दुचाकी चालवीताना वाहतूक विभागाचे नियमच पाळले नव्हते.

वागळे इस्टेट भागातील अंबिका नगर परिसरात शिपायाचा एका दुचाकीस्वाराशी वाद होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यामुळे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ आंतरिक चौकशी सुरू केली.२७ ऑक्टोबर रोजी त्या शिपायावर चार उल्लंघनांसाठी दंडाची पावती (चलन) काढण्यात आली. वाहन चालवताना वैध परवाना दाखवला नाही. दुचाकीला आरसे नव्हते. तसेच वाहनाची पाटी अर्धवट झाकलेली होती आणि वाहनावर अधिकृत चिन्हांसारखे बेकायदेशीर स्टीकर्स लावले होते. प्रत्येक उल्लंघनासाठी पाचशे असा असा एकूण दोन हजाराचा दंड ठोठावला गेला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, हेल्मेट न घातल्याबद्दल दंडित झालेल्या एका दुचाकीस्वाराशी तो शिपाई वाद घालताना दिसतो. त्या नागरिकाने सार्वजनिकपणे त्याच शिपायाला उलट प्रश्न केला. तुमच्याच वाहनावर नंबर प्लेट नीट नाही, आणि तुम्ही आम्हाला दंड करता?” त्या वेळी शिपाईने सांगितले की “दुचाकी टो करत होतो, पण चौकशीत त्याचा हा दावा खोटा ठरला. त्या शिपायावर खासगी वाहन नियमबाह्य वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. वाहन टो करत असल्याचा त्याचा दावा दिशाभूल करणारा आढळला. हेल्मेट न घालता वाहन चालवणे आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल त्या दुचाकीस्वारावरही योग्य ती कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.