ठाणे – गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने शीळ भागातील २१ इमारतींसह एकूण १५१ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. तसेच या बांधकामांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता पालिकेने अनधिकृत बांधकामांमध्ये घर का घेऊ नये, याचे कारण सांगत नागरिकांना सावध केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. यातील काही इमारतींची प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल झाली आहेत. अशाचप्रकारे मुंब्रा येथील शीळ भागातील खान कंपाऊंड परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींचे न्यायालयात गेले होते. या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आदेशामुळे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावर स्वत: मुंब्रा येथील शीळ भागात जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की ओढवली होती. येथील १७ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईदरम्यान, येथील आणखी चार अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. अशाप्रकारे या भागात एकूण २१ इमारतींचे बांधकाम पाडण्यात आलेला असतानाच, पालिकेने आता शिळ भागातील आणखी ११ इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शनिवारपासून कारवाई सुरू केली असून त्यात दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, शहरातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण पालिकेकडून करण्यात येत असून आतापर्यंत १५१ अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली आहे. यामध्ये आतापर्यंत ११७ अनधिकृत बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तर, ३४ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आली. अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचे बांधकाम, अनधिकृत टर्फ अशा प्रकारच्या बांधकामांचा समावेश होता.
अनधिकृत बांधकामांवर तोडले जाऊ शकते
अनधिकृत इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पालिकेने नागरिकांना अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेऊ नका असे आवाहन करत त्यामागचे कारण सांगितले आहे. ठाणे महापालिकेची कोणतीही रितसर परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणे, हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये गुन्हा आहे. अशा प्रकारच्या बांधकामांचे छायाचित्र आणि पंचनामे करण्याचे आदेश ठाणे महापालिकेकडून देण्यात आलेले असून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करुन ते निष्कासित करण्यासाठी कायदेशीर नोटीसा बजावणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच काही व्यक्ती, संस्था, विकासक हे अनधिकृत बांधकामे करुन त्यातील सदनिकांच्या खरेदी, विक्रीचे व्यवहार करतात. असे व्यवहार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. अशा प्रकारची बांधकामे करणे, अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करणे, अनधिकृत बांधकामांमध्ये सदनिका खरेदी करुन वास्तव्य करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा अनधिकृत बांधकामांबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करुन ती निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते.
बांधकामाच्या अधिकृतेबाबत खातरजमा करावी
विकासकांकडून इमारत अधिकृत असल्याबाबतची खोटी, बनावट कागदपत्र तयार करुन या इमारतीमधील सदनिका, गाळे नागरिकांना विकले जातात. अशा इमारतीमध्ये सदनिका, गाळे खरेदी केल्यास नागरिकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सदनिका, गाळे खरेदी करण्यापूर्वी इमारतीचे बांधकाम अधिकृत आहे किंवा कसे याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून सविस्तर चौकशी करुन बांधकामाच्या अधिकृतेबाबत खातरजमा करावी, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत बांधकामांमध्ये घर का घेऊ नये
ठाणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पालिकेकडून कोणत्याही क्षणी कारवाई करुन तोडण्यात येऊ शकते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करुन बांधकाम तोडल्यास त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकाम इमातीमध्ये घरे आणि गाळे खरेदी करुन नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.