ठाणे तसेच घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडत असून अनेक भागात डांबर वाहून जाऊन रस्त्यांची चाळण होत आहे. यंदाही घोडबंदर भागात असेच काहीसे चित्र दिसून येते. या खड्डे प्रवासामुळे नागरिक हैराण झाले असून यातूनच आता डांबराऐवजी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येऊ लागली आहे. यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकरणावर सातत्याने होणाऱ्या खर्चाला लगाम बसेल आणि नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत पालिका प्रशासकीय पातळीवर विचार सुरु असून यातूनच पालिकेने नितीन कंपनी आणि पातलीपाडा भागातील सेवा रस्त्यांवर काही ठिकाणी काँक्रीटचा रस्ता तयार केला असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग तर घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या मार्गांच्या दोन्ही बाजुला सेवा रस्ते आहेत. या रस्त्यांची लांबी ३२ किमीच्या आसपास आहे. शहरातील वाहतूकीसाठी हे रस्ते महत्वाचे मानले जातात. महामार्गांवर वाहतूक कोंडी होते. त्यावेळेस अनेकजण सेवा रस्त्यांचा वापर करतात. वाहतूकीसाठी महत्वाच्या असलेल्या या रस्त्याचे पालिकेने काही वर्षांपुर्वी डांबरीकरण केले होते. या कामानंतर दोन वर्षातच हे रस्ते उखडले होते. पालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापुर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येते. तरीही हे रस्ते उखडत असल्याचे दिसून येते. या कामावर लाखो रुपयांचा निधी खर्च होत असला तरी नागरिकांना मात्र खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

सेवा रस्त्यावरील खड्डे प्रवासामुळे नागरिक हैराण झाले असून यामुळेच त्यांच्याकडून डांबराऐवजी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणावर दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. तरिही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडत असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. हे रस्ते काँक्रीटचे झाले तर त्यावर खड्डे पडणार नाहीत आणि रस्ते दुरुस्तीवर दरवर्षी निधीही खर्च करावा लागणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. विविध संस्था अनेकदा पालिकेच्या परवानगीविनाच नवा कोरा डांबरी रस्ते खोदून त्याठिकाणी वाहिन्या टाकण्याची कामे करतात आणि कामे झाल्यावर खोदलेला खड्डा व्यवस्थितपणे बुजवित नाहीत. काँक्रीट रस्ता झाला तर असे प्रकारही थांबतील, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले.