डोंबिवली – डोंबिवली पूर्व भागातील लोकमान्य टिळक चौक (टिळक पुतळा) ते बापूसाहेब फडके रस्त्या दरम्यानचा टिळक रस्ता मंगळवार (ता.७) पासून सिमेंट काँक्रिटच्या रस्ते कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील अनेक रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहेत. या रस्त्यांमधील लोकमान्य टिळक चौक ते (टिळक पुतळा), स्टेट बँक, सुयोग, सर्वेश सभागृह ते ब्राह्मण सभा ते बापूसाहेब फडके रस्त्या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून डांबरीकरणाचा असलेल्या या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. सर्वेश सभागृहा समोरील खड्ड्यांमुळे तर रिक्षा चालक, दुचाकी स्वार हैराण होते.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने धावत होती. या रस्त्यावर दररोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होत होती. हा रस्ता एमएमआरडीएकडून काँक्रीटचा करणार होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेकडून या रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याची कामे वेळकाढूपणा करून करण्यात येत होती. माती आणि खडीने भरलेले या रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात वाहनांमुळे उखडून खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे होती.
अनेक नागरिक एमएमआरडीएच्या ठेकेदाराला भेटून टिळक पुतळा ते फडके रस्ता दरम्यानचा रस्ता लवकरात लवकर सीमेंट काँक्रीटचा करण्यात यावा, अशी मागणी करत होते. स्थानिक आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एमएमआरडीएच्या वरिष्ठांना संपर्क साधून डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा टिळक रस्ता लवकरात लवकर काँक्रिटीकरणासाठी हाती घ्यावा म्हणून सूचना केली होती. त्यामुळे एमएमआरडीएने आता प्राधान्याने टिळक रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. काँक्रिटीकरणासाठी लागणारी आवश्यक सामुग्री या रस्त्याच्या दुतर्फा आणून ठेवण्यात आली आहे.
ऐन दिवाळीत टिळक रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. टिळक रस्ता परिसरातील रस्त्यांवर दररोज वाहन भार वाढून वाहतूक कोंडी शक्यता आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी आणि एमआयडीसी, शिळफाटा रस्त्याकडे जाण्यासाठी टिळक रस्ता हा महत्वपूर्ण रस्ता आहे. डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांंनी शहरातील महत्वाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पर्यायी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही यादृष्टीने वाहतूक पोलीस पर्यायी रस्ते मार्गावर नियोजनासाठी तैनात करण्याचे नियोजन केले आहे.