लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : महापालिका परिवहन उपक्रमामध्ये (टीएमटी) झालेल्या जाहिरात कंत्राटातील गैरव्यवहारप्रकरणी संबंधित ठेकेदारासह परिवहनच्या आठ आजी-माजी अधिकाऱ्यांवर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर २००८ ते २०१८ या कालावधीत ६ कोटी ७३ लाख ५५ हजार ९४६ इतक्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

टीएमटी परिवहन सेवेतील तत्कालीन परिवहन व्यवस्थापक आणि कृषी उद्योग महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक अशोक करंजकर, श्रीकांत सरमोकदम, तत्कालीन परिवहन उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित, तत्कालीन मुख्य लेखापाल अजित निऱ्हाळे, तत्कालीन वाहतूक अधीक्षक गुरुकुमार पेडणेकर, तत्कालीन अंतर्गत लेखापरीक्षक पीटर जॉन पिंटो, सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत धुमाळ, आगार व्यवस्थापक दिलीप कानडे तसेच मे. सोल्युशन अ‍ॅडव्हरटायझिंग या जाहिरात कंपनीचे प्रवीण सोलंकी आणि गुज्जू अ‍ॅड्स् प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भावेश भिंडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीएमटीच्या बस थांब्यांवर २००८ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क मे. सोल्युशन अ‍ॅडव्हरटायझिंग कंपनीला दिले होते. या कामाच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ठाण्यातील प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या संदर्भात तीन महिन्यांत प्राथमिक चौकशी पूर्ण करून अंतिम निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्यास परवानगी दिली होती. मात्र, या विभागाने याबाबत काहीच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फटकारले. त्यानंतर या विभागाने आठ दिवसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानुसार या विभागाने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण काय?

ठाणे परिवहन उपक्रमाने २००८ ते २०१८ या कालावधीत बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर शहरात ४७० बस थांबे उभारून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या कामाचा ठेका सोल्युशन अ‍ॅडव्हरटाइझिंग कंपनीला दिला होता. देण्यात आला होता. हा ठेका मिळविण्यासाठी गुज्जू अ‍ॅड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मे. विश्वर पब्लिसिटी आणि मे. झेनिथ आऊटडोअर या कंपन्यांचे बनावट करार तयार करून ते खरे असल्याचे भासविल्याचा आरोप सोल्युशन अ‍ॅडव्हरटाइझिंग कंपनीच्या मालकांवर आहे. तर कंत्राटासाठी कोणतीही कागदपत्रे दिली नसून सोल्युशन कंपनी त्याचा गैरवापर केल्याचा आरोप मे. झेनिथ आऊटडोअर या कंपन्यांच्या मालकाने केला होता. तर, या कंपनीला ठेका मिळून देण्यासाठी सहकार्य केल्याचा आरोप टीएमटीच्या अधिकाऱ्यांवर आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.