ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबवून मिरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी दोन महिन्यांपुर्वी संपुर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. यामुळे राज्य शासनाबरोबरच नागरिकांकडून कौतुकाची थाप मिळविणारे पांडे यांना मराठी मोर्चा प्रकरण चांगलेच भोवले आणि त्यावरूनच त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या ठाण्यातील यापुर्वीच्या आक्रमक ते मवाळ या कार्यपद्धतीची चर्चाही सुरू झाली आहे.
मिरारोड मराठी मोर्चा प्रकरणामुळे मिरा-भाईंदरचे पोलिस उपायुक्त मधुकर पांडे यांची सरकारने उचलबांगडी केली. या प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले पांडे यांच्या कार्यपद्धतीची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. पांडे यांनी यापुर्वी ठाणे पोलिस आयुक्तालयात उपायुक्त आणि सह पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. ठाणे पोलिस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडे परिमंडळ एक म्हणजेच ठाणे शहराची जबाबदारी होती. डॅशिंग तसेच आक्रमक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी स्वत:चा एक दरारा निर्माण केला होता. अनेक गुन्हे उघडकीस आणण्याचे काम केले होते. परंतु ठाण्याहून त्यांची इतर शहरात बदली झाली. कालांतराने ते ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक म्हणून पुन्हा आले. पुढे ठाण्याचे सह आयुक्तही झाले. या कारकीर्दित आक्रमक असलेले पांडे काहीसे मवाळ झाल्याचे दिसून आले. या काळात त्यांच्या कामाचा फारसा ठसा उमटला नाही.
यापुर्वी ठाणे ग्रामीण पोलिस क्षेत्रात मिरा-रोड शहराचाही समावेश होता. पुढे मिरा-भाईदर क्षेत्र वगळून नवीन पोलिस आयुक्तालयाची निर्मीती करण्यात आली. ठाणे ग्रामीणमध्ये काम केलेले असल्यामुळे मधुकर पांडे यांना मिरा-रोड भागाचा भौगोलिक आणि गुन्हेगारी स्थितीची माहिती होती. त्याचा फायदा पांडे यांना आयुक्त म्हणून काम करताना झाला. याठिकाणी मात्र त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत पांडे यांनी विविध उपक्रम राबविले.
कृत्रिम बुद्धीमत्ता (ए आय) च्या माध्यमाने आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर करुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणे तसेच पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या नागरीकांना त्यांना आलेला अनुभव नोंदविण्याकरीता ई-अभिप्राय सेवा सुरु केली, असे उपक्रम राबविले. यामुळे कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत १०० पैकी ८४.५७ गुण मिळवून पांडे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. यावरून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता. राज्य शासनानेही त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली होती. परंतु मराठी मोर्चा प्रकरण त्यांना हाताळता आले नाही आणि त्यांची कारकिर्द वादात सापडली. या मोर्चाला परवानगी नाकारल्यावरून पोलिस दलावर टिका झाली. सत्ताधारी नेत्यांही यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दोन महिन्यांपुर्वी प्रथम क्रमांक पटकाविणारे पांडे यांना मराठी मोर्चा प्रकरण भोवले आणि या वादामुळे त्यांची सरकारने तडकाफडकी बदली केली.
आयपीएस अधिकारी मधुकर पांडे हे १९९६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पांडे यांनी चंद्रपूरच्या नक्षल भागात पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली, चंद्रपूर भागात काम केले. ठाणे ग्रामीणचेही ते पोलिस अधिक्षक होते. त्यांनी ठाणे शहर पोलीस आणि नागपूर शहर पोलीस येथे पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यासोबतच अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून मुंबई शहर, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त, नवी मुंबई अपर पोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलिसांचे अपर पोलीस आयुक्त, ठाण्याचे सह आयुक्त अशा पदांवर त्यांनी यापुर्वी काम केले आहे.