ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ शुक्रवारी भरधाव कंटेनर उलटल्याने येथील उड्डाणपूलाखालील मार्गिका बंद झाली आहे. त्यामुळे पातलीपाडा ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली असून, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांना कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. या अपघाताचा परिणाम घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरही झाला आहे. हे ही वाचा. पूर्व द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात, दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू; तर दोनजण जखमी हे ही वाचा. ठाणे शहरातील रिक्षा चालकांचा संपाचा इशारा, दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम कमी करण्याची मागणी ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने कंटेनर वाहतुक करत होता. हा कंटेनर पातलीपाडा उड्डाणपूल जवळ आला असता, वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला. या अपघातामुळे उड्डाणपूलाखालील संपूर्ण मार्गिका बंद झाली आहे. त्यामुळे घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना उड्डाणपूलावरून वाहतुक करावी लागत आहे. अपघातग्रस्त वाहनाला रस्त्यावरून बाजुला काढण्याचे कार्य सुरू आहे. परंतु अपघातामुळे पातलीपाडा उड्डाणपूल ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. सकाळी १० नंतरही वाहतुक कोंडी सुटली नव्हती. त्यामुळे चालकांना अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे.