ठाण्यातील खड्डय़ांचा महिलावर्गाला ताप; अधिक रक्तस्राव, वेदनांसोबत मानसिक ताणात भर

किशोर कोकणे, आकांक्षा मोहिते
ठाणे : शरीराची हाडे खिळखिळी करणाऱ्या खड्डेमय रस्त्यांवरील प्रवासाचा अनुभव ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांतील नागरिक घेत असले तरी महिलावर्गाला याचा अधिकच त्रास सोसावा लागत आहे. विशेषत: मासिक पाळीदरम्यानच्या दिवसांत आधीच शारीरिक वेदना सहन करत घर ते कार्यालय अशी धावपळ करणाऱ्या महिलांचा प्रवास रस्त्यांवरील खड्डय़ांनी अधिक वेदनादायी बनवला आहे.

खड्डय़ांमधून वाट काढत कार्यालयांत गेल्यानंतर मोठय़ा प्रमाणात अति रक्तस्रावाची समस्या महिलांना भेडसावू लागली आहे. या रक्तस्रावामुळे शारीरिक वेदनेसोबत मानसिक त्रासही होत असल्याचे या महिलांचे म्हणणे असून डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे उपनगरीय रेल्वे प्रवासास सर्वसामान्यांना सरसकट परवानगी नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातून अनेक जण त्यांच्या खासगी वाहनाने मुंबईत कामानिमित्त जात असतात. महिलांचे प्रमाण यामध्ये अधिक आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने जिल्ह्य़ातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था केली आहे. ठाणे जिल्ह्य़ात मुख्य रस्ते तसेच अंतर्गत मार्गावर खड्डय़ांचे जाळे तयार झाले आहे. मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना अशक्तपणा येत असतो. त्यात वाहने चालवून कार्यालय गाठावे लागते. या प्रवासात

वाहने खड्डय़ांमध्ये आदळतात. त्यामुळे अनेक महिलांना अति रक्तस्रावाची समस्या निर्माण होऊ लागली आहे. कंपनीमध्ये रक्तस्रावामुळे काम करण्याची इच्छा होत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम कामाच्या ठिकाणी होत असल्याचेही महिलांनी सांगितले. गरोदर महिलांनाही या खड्डय़ांचा परिणाम होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

ठाण्यातील ज्ञानेश्वरनगर भागात राहणाऱ्या स्नेहा बिंद या दररोज मुलुंडला त्यांच्या दुचाकीने कामाच्या ठिकाणी जात असतात. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने मासिक पाळीदरम्यान खड्डय़ांतून प्रवास केल्यास त्याचा त्रास होतो, असे त्यांनी सांगितले. एखादा खड्डा समोर आल्यास मनात भीती निर्माण होते. खड्डय़ांचा विचार करूनच मानसिक ताण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कळवा येथे राहणाऱ्या मेघा गायकवाड यांनी सांगितले की, अनेक महिलांना विविध शारीरिक आजारांमुळे महिलांची मासिक पाळी नियमीत येत नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रवास बंद आहे. त्यात मासिक पाळीमध्ये रस्त्यांवरून प्रवास करताना खड्डय़ांमधून वाहने गेल्यास अति रक्तस्त्राव होतो.

खड्डय़ांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीत अनेकदा ठाण्याहून कल्याण गाठण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. या सर्व प्रवासा दरम्यान रस्त्याकडेला कोणतेही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान रस्त्याकडेला स्वच्छतागृहे नसल्याने त्याचा फटकाही बसत असल्याचे चित्रा म्हस्के या प्रवासी महिलेने सांगितले.

काही महिलांना मासिक पाळीदरम्यान अति रक्तस्राव होत असतो किंवा पोटात दुखत असते. अशा महिलांना रस्त्यावरील खड्डय़ांवर आदळल्याने आणखी त्रासदायक वेदना होत असतात. ज्या महिलांन अति रक्तस्राव होत असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावे. गरोदर महिलांना रस्त्यावरील खड्डय़ांचा धोका असतो. त्यामुळे अशा महिलांनी दुचाकीचा प्रवास टाळला पाहिजे. प्रवास करायचा असेल तर स्वत:च्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

-डॉ. शोभना चव्हाण, स्त्रीरोगतज्ज्ञ, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय.

काही महिलांना मासिक पाळीदरम्यान अति रक्तस्राव होत असतो किंवा पोटात दुखत असते. अशा महिलांना रस्त्यावरील खड्डय़ांवर आदळल्याने आणखी त्रासदायक वेदना होतात. या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावे. गरोदर महिलांना रस्त्यावरील खड्डय़ांचा धोका असतो. त्यामुळे अशा महिलांनी दुचाकीचा प्रवास टाळला पाहिजे. प्रवास करायचा असेल तर स्वत:च्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

– डॉ. शोभना चव्हाण, स्त्रीरोगतज्ज्ञ, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय