अंबरनाथ : महसूल अधिकाऱ्यांमार्फत अंबरनाथ तहसिल कार्यालयात एका गौण खनिजाचा पकडलेल्या ट्रकवर कारवाई सुरू असताना ट्रक मालकाने गोंधळ घालून सदरचा ट्रक कार्यालय परिसरातून पळवून लावण्याचा प्रताप केला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात ट्रकचालक आणि मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने अंबरनाथच्या तहसिल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता.
अंबरनाथ तहसिल कार्यालयातील दक्षता पथकाचे बदलापूर मंडळ अधिकारी आणि त्यांचे सहकारी अंबरनाथ पश्चिमेतील फातिमा रस्त्यावर वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी ट्रक क्रमांक एमएच ०५ एएम हे वाहन सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गौण खनिज प्रकारातील दोन ब्रास वजनाचे दगड पावडर घेऊन जात होते. वाहन चालक विजय जाधव यांच्याकडे यावेळी गौण खनिज वाहतूक परवाना तसेच दुय्यक विक्री परवाना नव्हता. त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांनी तपासणी करून हे वाहन अंबरनाथच्या तहसिल कार्यालयात आणले. हे वाहन जमा करण्याची प्रक्रिया तहसिल कार्यालयाकडून सुरू करण्यात आली होती. त्याचवेळी ट्रकचा मालक अनमोल सिंग याने ट्रकचालक आणि आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने तहसिल कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. ट्रकमालक अनमोल सिंग एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सरकारी कामकाजात अडथळा आणून मुद्देमालासह ट्रक तहसिल कार्यालयातून पळवून लावला. या प्रकारामुळे अंबरनाथच्या तहसिल कार्यालयात एकच खळबळ उडाली.
या प्रकारानंतर महसूल अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याला कळवली. अंबरनाथ पोलिसांनी बदलापूर मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने हे वाहन तात्काळ पकडले आणि पुन्हा ताब्यात घेतले. याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकमालक आणि ट्रकचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तहसिलदार अमित पुरी यांनी दिली आहे. या प्रकारामुळे मुजोर गौण खनिज वाहतूकदार आणि वाहन मालकांचा मुजोरपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मात्र या कारवाईनंतर गौण खनिज वाहतूक करणारे वाहनचालक, वाहन मालक तसेच उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सर्व गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारे संबंधित विकासक तसेच कंत्राटदार यांना तहसिलदारांनी आवाहन केले आहे. अंबरनाथ तालुक्यात विकास कामासाठी होत असलेल्या उत्खननाबाबत संबंधित कार्यालयाकडून उत्खनन तसेच वाहतूकीची परवानगी घेऊनच उत्खनन आणि वाहतूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विनापरवानगी उत्खनन किंवा वाहतूक करताना आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.