लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : थकित असलेल्या वेतनाची कामगार मागणी करतात, या रागातून डोंबिवली जवळील पलावा येथील विकासकाने आपल्या कार्यालयात दोन्ही कामगारांना वेतन देतो सांगून बोलावून घेतले. त्यांना वेतन मागता काय, असे प्रश्न करत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही भाऊ जखमी झाले.

अचानक झालेल्या या मारहाण प्रकरणाने दोन्ही भाऊ घाबरले. त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात विकासका विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी वैद्यकीय अहवाल पाहून या दोन्ही कामगारांच्या तक्रारीवरून विकासका विरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. राज शहा या कामगाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण कुटुंबींयासह भाडुंप येथे राहते. आपण व आपला भाऊ ठाणे येथे एका विकासकाच्या प्रकल्पात बागकामाच्या देखभालीचे काम करतो. या कामाचे आपण व आपल्या भावास दरमहा १४ हजार रूपये वेतन मिळते.

आणखी वाचा-डोंबिवलीत तरूणीचा पाठलाग करणाऱ्या इसमाला नागरिकांचा चोप

घरची अडचण असल्याने आपण विकासकाकडून आगाऊ तीन हजार रूपये घेतले होते. त्यामुळे उर्वरित अकरा हजाराची रक्कम येणे बाकी होती. ही रक्कम देण्याची मागणी आपण विकासकाकडे करत होतो. आपल्या मागणीमुळे विकासकाने आम्हा दोन्ही भावांना सोमवारी संध्याकाळी डोंबिवली जवळील पलावा येथील रो हाऊस मधील त्यांच्या कार्यालयात वेतन घेण्यासाठी बोलविले. वेतन मिळेल या आशेवर आम्ही तेथे गेलो. संध्याकाळी साडे सात वाजता तेथे विकासकाने आम्हाला वेतन मागता काय असे प्रश्न करत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत खांदा, गुडघे, कोपराला दुखापती झाल्या. या झटापटीत आपला मोबाईल जमिनीवर पडला. मोबाईल फुटून सीमकार्ड तुटले.

या प्रकारानंतर आपण मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलो. आपणास पोलिसांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठविले. तेथील वैद्यकीय तपासणी अहवाल घेऊन आपण पुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात आलो. आपल्या तक्रारीवरून पोलिसांनी विकासका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two brothers beaten up by developer in palava dombivli for demanding salary mrj