आजही रोज नकारात्मक गोष्टींचा भडिमार चोहोबाजूने होत असताना सकृत दर्शनी अशक्यप्राय वाटणारे ‘महाभाग’ आजही आहेत. खरं म्हणजे अशा माणसांमुळेच सामान्य माणसाला जगणं थोडं सुसह्य होत आहे.
आपण कष्टाने मिळविलेले पसे कोणतीही ओळख नसलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता द्यायचे वा ज्या गावाला पूर्वी कधी गेलो नाही, पुन्हा कधी जाण्याची शक्यता नाही अशा गावी शाळा बांधण्यासाठी लाखो रुपये द्यायचे ही खरोखरच अतिशय अवघड गोष्ट आहे. रामदासांनी ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी’ या श्लोकात मांडलेले विचार प्रत्यक्ष जगलेली अशी ही माणसं आहेत. या सर्वाना शतश: धन्यवाद!
डिसेंबर २००४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडगावापासून ५ कि.मी. आत असणाऱ्या रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या ‘माध्यमिक विद्या मंदिर’ येथे शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मी गेलो होतो. त्यावेळी शाळेची अवस्था भयावह होती. या लहान गावात शाळा गावकीने बांधणे केवळ अशक्य होते. सरकारकडून लवकर काही मदत मिळण्याची शक्यता नाही अशा स्थितीत मुख्याध्यापक जाधव सरांनी एखादा देणगीदार शोधण्याची विनंती केली. जाधव सरांची कळकळ मला अस्वस्थ करून गेली. मी एका मित्राला त्या शाळेची परिस्थिती कथन केली. त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे प्रत्यक्ष शाळेला भेट देण्यास फेब्रुवारी २००६ साल उजाडले. शाळेच्या जुन्या भिंती आणि पिलरमध्ये एक एक फुटाचे अंतर तयार झालेले. शाळेत सुरू असलेले १० वीचे जादा तास मांडवाखाली बेंच टाकून घेण्यात येत होते.
शाळेची एकंदर परिस्थिती आणि शाळेसाठी जाधव सरांची धडपड, त्यांचा प्रामाणिकपणा बघून पहिल्या भेटीतच त्या देणगीदारांनी एकटय़ाने शाळा बांधून देण्याची तयारी दर्शवली. अट फक्त एकच ‘माझे कुठेही नाव येता कामा नये आणि शाळा जूनमध्येच नियमितपणे सुरू झाली पाहिजे.’ जाधव सरांनी जबाबदारी स्वीकारली आणि जून २००६ ला शाळा नवीन इमारतीत सुरू झाली.
जून २००७ च्या दरम्यान माझे दुसरे एक मित्र त्यांच्या कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांना मोठी रक्कम मिळाली. मी त्यांना म्हटले, यातील काही रक्कम सत्कारणी लावा. त्यावर ते म्हणाले, तुम्हीच मार्गदर्शन करा त्याविषयी.
मी त्यांना शाळा दाखवण्याचे ठरवून पुढचा निर्णय आपण स्वत:च घ्या असे सुचवले. त्यानुसार लगेचच्या रविवारी शाळा भेटीला जाण्याचे ठरले. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात असणाऱ्या उसद खुर्द गावातील छत्रपती शिक्षण मंडळांच्या अभिनव ज्ञान मंदिराला आम्ही भेट दिली. पूर्णपणे डोंगराळ भागात असलेल्या या शाळेतील एकेका खोलीत दोन-दोन, तीन-तीन वर्ग भरवले जात होते. ८ ते १० कि.मी अंतरावर असणाऱ्या जवळपासच्या १२ ते १५ गावांतून मुले शाळेत येत होती. शाळेची पाहणी केल्यानंतर इतक्या दुर्गम भागातील तसेच इतक्या दुरवस्थेतील शाळा कधी बघितली नव्हती असे सांगत त्या मित्रांनी शाळेसाठी अकरा लाख रुपये दिले.
उसर शाळेच्या उद्घाटनाच्यावेळचा प्रसंग. माणगांव श्रीवर्धन रस्त्याने उसरला जातानाचा पूर्ण भाग डोंगराळ आहे. वस्त्या कुठेच दिसत नाहीत. आमच्या गाडीत रातवड शाळा ज्यांनी बांधून दिली त्यांचे आई वडीलही होते. त्यांना तेथील शाळेत येणारी मुले ८ ते १० कि.मी अंतरावरून चालत येतात हे ऐकताच धक्का बसला. त्यांनी लांबून येणाऱ्या मुलांना सायकल घेवून दिल्या पाहिजेत, असे सुचवले. एवढेच नव्हे तर जेवढय़ा सायकल लागतील तेवढय़ा देण्याचे कार्यक्रमात जाहीर केले. कार्यक्रम संपल्यावर मी माणगावला जाणारा रस्ता छत्रपती शिक्षण मंडळाच्याच वडघर शाळेवरून जातो असे सांगत त्या शाळेलाही भेट देण्याची कल्पना मांडली. माणगाव तालुक्यातील वडघर मुद्रे येथील ‘सरस्वती विद्या मंदिर’ ही शाळासुद्धा पूर्णपणे डोंगराळ भागात होती. तिथे गेल्यावर सायकल देणारे देणगीदार मला बाजूला घेवून म्हणाले, ‘कर्वे, तुम्ही सायकल लांबून येणाऱ्या तिन्ही शाळांच्या मुलांसाठी घ्या’ तीनही शाळांच्या मुलांची संख्या सुमारे ८०० होती. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर लांबून येणाऱ्या १७५ मुलांची नावं त्यांचे गाव आणि त्यांचे शाळेपासूनचे अंतर अशी यादी जाधव सरांनी दिली. त्या यादीनुसार ‘हिरो’ कंपनीच्या सायकलींचा ट्रक जूनमध्ये उसरला दाखल झाला.
गप्पांच्या ओघात एका मित्राला ही गोष्ट सांगितल्यावर त्याने, ‘कर्वे, पावसाळ्यात दप्तरे, छत्री घेवून मुले सायकल कशी चालवणार?’ असा प्रश्न विचारत त्या मुलांसाठी रेनकोटची व्यवस्था केली. अनेक वेळा देणगी देण्याचे नवीन मार्गही देणगीदारानीच सुचवले.
उसर शाळेच्या उद्घाटनासाठी ठाण्याहून सकाळी आठ वाजता निघून परत येईपर्यंत साडेआठ वाजले होते. आमच्याबरोबर एक वयस्कर दांपत्यही होते. त्यांना हृदयविकारही होता तर पत्नीच्या पायाला फायलेरियाचा त्रास. या सर्व प्रवासाचा त्यांना खूपच त्रास झाला होता. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या मुलाला दूरध्वनी करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यावर त्या दोघांना ताप आला असल्याचे समजले. चौथ्या दिवशी मी त्या गृहस्थांनाच दूरध्नी करून त्या दिवसाचा कार्यक्रम फारच वाढल्याबद्दल क्षमा मागितली. त्यावर ते म्हणाले, एवढे चांगले काम बघायला कुठे मिळते, आजारी पडलो तर दोन दिवस आराम केला. मला वाटतं देणगीदारांची ही मानसिकताच आमच्या सारख्यांना ऊर्जा पुरवत असते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2015 रोजी प्रकाशित
मदतीचे अज्ञात हात
माझ्या आयुष्याच्या ‘सेकंड इिनग’ने मला भरभरून दिले. माझ्या जीवनाचा कॅनव्हास खूप मोठा केला आणि सकारात्मक अनुभवांची एक मोठी शिदोरीच मला दिली.
First published on: 29-01-2015 at 08:41 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unknown helping hands