कल्याण : आपल्याला लिहायला काय आवडते हे फार महत्त्वाचे आहे. आपल्याला मुक्तछंद प्रकारातील लिखाण आवडते, प्रेम कविता आवडतात, निसर्गवर्णन आवडते की काही गंभीर विषयाला सहजरीत्या मांडणे आवडते हे कोणतीही काव्यरचना करताना कळणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या लिखाणाची जातकुळी अर्थातच रुची कळली की काव्य करणे सोपे होते, असे प्रतिपादन कवी वैभव जोशी यांनी केले.
लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट अंतर्गत कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित कवितेची कार्यशाळा कार्यक्रमात केले. यावेळी काव्य रसिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
कवी वैभव जोशी यांनी कवितेचे अनेक प्रकार, त्यातील विविध पदर उलगडून सांगताना आपल्या उमेदीच्या काळात काव्य करताना आलेले अनुभव देखील प्रेक्षकांना सांगितले. कवितेची व्याख्या ही अशी एका साचातील व्याख्या नाही. प्रत्येक कवीनुसार ती बदलते. कविता म्हणजे एखादी भावना जी तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगू पाहता पण ती भावना नेमक्या आणि मोजक्या शब्दात सांगतात आणि ती समोरच्याला चटकन उमगते, अशी शब्दरचना असते, तर सृजनशील लिखाणाचे महत्त्वाचे चार आधारस्तंभ असतात. वाचन, चिंतन, मनन आणि मग लेखन. हे आपण पक्के करून घ्यायला हवे. त्यामुळे काव्यरचना करताना वाचनही तितकेच महत्त्वाचे, असे वैभव जोशी यांनी सांगितले.
मात्र असे लिखाण करताना त्यातला आपल्या दृष्टिकोनातून आपण लिहायला पाहिजे. त्याला एक अनेक पदर असायला हवे, नाहीतर मग ते एक वर्णन अथवा वृत्तांकन होते. तुमच्यातल्या कवी लिहीत असताना तुमच्यातला वाचकही सजग हवा. कविता म्हणजे कमी शब्दात मोठा आशय. मात्र हे लिहिताना पुनरावृत्ती टाळावी, हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
जे अनुभवतो ते शब्दबद्ध करणे महत्त्वाचे
अनेकांना असे वाटते की प्रत्येक कविता ही कवीचा अनुभव असतो. मात्र तुमच्या सगळ्या कविता तुमच्या अनुभवाचे संचित नसते. तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीकडे कशा सहिष्णुतेने पाहता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्यातून तुम्हाला जे लिहावेसे वाटते ते काव्यही तितकेच उत्तम असू शकते. त्यामुळे जे अनुभवतो ते शब्दबद्ध करणे तितकेच महत्त्वाचे आहे. यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत काव्यरचनेबाबत अनेक प्रश्न विचारले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी कवी वैभव जोशी यांचा सत्कार करत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कुणाल रेगे यांनीही जोशी यांच्याशी संवाद साधला.
परभाषेत मायबोली इतकाच आत्मविश्वास हवा
अनेकदा उर्दू काव्य एक अभिनिवेश लिहून ठेवले जाते. मला या संबंधित भाषेतील किती माहिती आहे हा त्यामागील हेतू असतो मात्र तो प्रत्येकाला उमगेलच असे नसते. त्यामुळे उर्दू असो अथवा कोणतीही भाषा त्या भाषेत आपल्याला आपल्या मायबोली इतके आत्मविश्वासाने वावरता येत असेल तर निश्चित त्या भाषेत लिहावे. अथवा त्या संबंधित भाषेतील जे साधेसोपे शब्द माहिती असतील त्यातही लिखाण करणे कधीही उत्तम, असे मत यावेळी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.
कवी आणि गीतकार यांच्यात खूप मोठा असा काही फरक नाही. गीत लिहिताना त्या सिनेमातील पात्रानुसार माहिती हवी. कारण एखादे गीत त्या सिनेमाला पुढे नेत असते. यामुळे गीतांमध्ये देखील संतुलन हवे आणि गीतकार म्हणून लिखाण करताना त्यात कवी म्हणून आपली एक ठळक ओळख जपली पाहिजे त्या गीतात आपली स्वाक्षरी पाहिजे, असेही वैभव जोशी यांनी सांगितले.
