डोंबिवली : संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रसारक वामन अच्युत देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून वामन देशपांडे यांच्यावर डोंंबिवली एमआयडीसीतील अरिंदम रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपाचाराला ते प्रतिसाद देत नसल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रिझर्व्ह बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर देशपांडे डोंबिवली पूर्वेतील अयोध्यानगरी भागात राहण्यास आले. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दैनंदिन ज्ञानेश्वरी, दैनंदिन दासबोध, संत तुकाराम, अशा धार्मिक विषयांवर त्यांनी लिखाण केले. याशिवाय कविता, भावगीते, भक्तिगीते, कथा, समीक्षा, कांदबरीचे त्यांनी लेखन केले. देशपांडे यांची १२५ पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची १३ गाणी जुन्या ध्वनीमुद्रिकेवर ज्येष्ठ गायक रामदास कमल यांनी गायली होती. संत साहित्यासह विविध विषयांवरील ११८ पुस्तकांना वामन देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. धार्मिक विषयांसह विविध विषयांवरील सुमारे तीन हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. आपल्या घरातील पुस्तकालय हेच सरस्वतीचे मंदिर आहे, अशी त्यांची भावना होती. ते संगीत समीक्षक आणि संगीतज्ञ म्हणून ओळखले जात होते. ६० वर्ष त्यांचे लिखाण सुरू होते.

दुर्गा भागवत, वसंत बापट, रवींद्र पिंगे, शंकर वैद्य, वा. रा. कान्त, मंगेश पाडगावकर या ज्येष्ठ साहित्यिकांशी त्यांचा निकटचा संबंध होता. अच्युतानंद टोपण नावाने त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिखाण केले. महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे ते दहा वर्ष अध्यक्ष होते. ते उत्तम वक्ते होते. संत साहित्याचा घरोघरी प्रसार झाला पाहिजे यासाठी त्यांनी राज्यभर प्रवास करून रसाळ वाणीने प्रवचने दिली दिली. ४० हून अधिक अखिल भारतीय साहित्य संमेलनांमधील परिसंवाद, चर्चासत्रांमध्ये ते सहभागी झाले होते. आचार्य अत्रे जन्मशताब्दीचा आचार्य अत्रे पुरस्काराचे ते मानकरी होते.

‘जुने संत, साहित्यिक वैभव अधिकारवाणीने सांगणाऱ्यां व्यक्ति आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यामधील एक वामन देशपांडे होते. डोंबिवलीतील संत साहित्य आणि विद्वतजनांमधील ते एक भूषण होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषद डोंंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी दिली.