|| ऋषिकेश मुळे / आशीष धनगर

ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख उमेदवारांची मालमत्ता कोटींच्या घरात; शिवसेनेचे प्रताप सरनाईक सर्वात श्रीमंत उमेदवार:- ठाणे : जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या २१३ उमेदवारांमध्ये प्रमुख पक्षांचे अनेक उमेदवार कोटय़धीश असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघड झाली आहे. ओवळा माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप

सरनाईक हे सर्वात धनाढय़ उमेदवार असून त्यांची मालमत्ता १२६ कोटी २९ लाख ७९ हजार ३६३ रुपये इतकी आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे राजकारणाचे तत्त्व मानले जात असले तरी, अनेक उमेदवारांकडे लाखोंची घडय़ाळे असल्याचेही प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते. काही उमेदवारांच्या पत्नीही कोटय़धीश आहेत.

एकीकडे उमेदवार मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा प्रचारातून मांडत असताना दुसरीकडे उमेदवारांचे शिक्षण, त्यांच्याकडील संपत्ती या गोष्टीही उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे मतदारांच्या समोर येत आहेत. ठाणे जिल्ह्य़ातून निवडणूक लढवत असलेल्या २१३ उमेदवारांपैकी प्रमुख पक्षांचे उमेदवार कोटय़धीश असल्याचे दिसून येते. ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे सर्वात धनवान उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर १०४ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. तर २१ कोटी ८९ लाख ६९ हजार १६३ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. मात्र  सरनाईक यांच्या नावावर ११० कोटी ९६ लाख ५८ हजार १६८ रुपये इतके कर्जही आहे. धनवानांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मीरा-भाईंदर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसैन असून त्यांची एकूण मालमत्ता ७८ कोटी आहे. मीरा-भाईंदरमधीलच भाजपचे नरेंद्र मेहता यांची मालमत्ता ५३ कोटींच्या घरात असून धनाढय़ उमेदवारांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी आहेत.

महागडय़ा बंदुका, घडय़ाळे

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या नावावर ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचे एक रिव्हॉल्वर आणि एक पिस्तूल आहे. तर प्रताप सरनाईक यांच्या नावावर ७ लाख रुपयांची एक बॅरल बंदूक आणि रिव्हॉल्वर आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे ५८ हजार रुपये किमतीचे एक रिव्हॉल्वर आहे. तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्याकडे एक लाखाची रिव्हॉल्वर असून त्यांच्या पत्नीच्या नावे ५० हजार रुपयांची रिव्हॉल्वर आहे. कल्याण ग्रामीणचे मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या नावावर ४५ हजार रुपयांची पिस्तूल असून त्यांच्याकडे अमेरिकन बनावटीची २८ हजार रुपयांची रायफल आहे. मुरबाड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांच्याकडे साडेसात लाखांची दोन मनगटी घडय़ाळे असून त्यांची पत्नी ज्योती हिंदुराव यांच्या नावे अडीच लाखांची दोन मनगटी घडय़ाळे आहेत.

उमेदवारांच्या पत्नीही कोटय़धीश

कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या पत्नीच्या नावे ८६ कोटी ७९ लाख ५९ हजार ५३९ रुपयांची मालमत्ता आहे. तसेच एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, पांडुरंग बरोरा, महेश चौघुले, संतोष शेट्टी, रवींद्र चव्हाण, सय्यद मोहम्मद हुसैन आणि नरेंद्र मेहता या उमेदवारांच्या पत्नीच्या नावावरदेखील कोटय़वधी रुपयांची मालमत्ता आहे.