कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा येथे सम्राट अशोक चौक महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सुशोभित करण्यात येणार होता. मात्र, या चौकाच्या सुशोभीकरणासाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी गटारे ठेकेदार, स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी गटारे, पायवाटांवर खर्च करून दहा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी आयुक्तांकडे केला.
ठाणकरपाडा येथील रमाबाई आंबेडकर उद्यानाजवळील सम्राट अशोक चौक सुशोभित करण्यासाठी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी दहा लाखांचा विशेष विकास निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून सम्राट अशोक चौक विकसित करण्याचे काम मेसर्स रामकृष्ण मजूर संस्थेला देण्यात आले होते. आमदार पवार यांनी या चौक सुशोभीकरणाची माहिती महापालिकेतून घेतली. त्यावेळी त्यांना तांत्रिक मान्यतेच्या नस्तीमध्ये चौक सुशोभीकरणासाठी लागणारे कोणतेही साहित्य बांधकाम विभागाने मंजूर केले नसल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा तपास करताच चौक सुशोभीकरणाचा निधी गटारे, पायवाटांवर खर्च केल्याचे निदर्शनास आले. हा निधी अन्यत्र वळवून दहा लाखांचा घोटाळा पालिका अधिकारी, ठेकेदार आणि नगरसेवकांच्या संगनमताने करण्यात आला आहे, अशी टीका आमदार पवार यांनी केली आहे.
ठाणकरपाडा भागात २०१० ते २०१५ या कालावधीत झालेल्या सर्व विकास कामांची चौकशी केली तर अनेक गैरप्रकार उघडकीस येतील. चौक सुशोभीकरणासह सर्व प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशी करण्यात यावी.
नरेंद्र पवार, आमदार
ठाणकरपाडा भागातून दोन विकास आराखडय़ातील रस्ते गेले आहेत. या रस्त्यांची पालिकेने अद्याप निश्चिती केली नाही. या रस्त्यांमध्ये चौक सुशोभीकरण करण्यात येणार होते. पालिकेने रस्ता निश्चिती करून द्यावी यासाठी दीड वर्ष तगादा लावला. पण अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. अखेर निधी परत जाईल या भीतीने या मंजूर निधीतून प्रभागात पेव्हर ब्लॉक, पायवाटा करून घेतल्या आहेत. या निधीत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही.
मोहन उगले, स्थानिक नगरसेवक
पारसिकनगर ते नाशिक नवा रस्ता
प्रतिनिधी, ठाणे
शहर नियोजनाच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाण्यातील राजकीय नेत्यांचे स्वप्नरंजन अजूनही कायम असल्याचा प्रत्यय शहरवासियांना आला आहे. सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही कळवा खाडीवरील उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या पुलाच्या कामात पर्यावरण विभागाचे अडथळे असल्याचे पूर्वीच स्पष्ट झाले आहे. असे असताना या नियोजीत उड्डाणपुलास वळसा घालून कळव्याच्या खाडीवरुन थेट नाशिक महामार्गापर्यत पोहचू शकेल, अशा रस्त्याचे आराखडे आता तयार केले जात असून खाडीवरील उड्डाणपुलाचा पत्ता नसताना महामार्गाला जोडणारा या रस्त्याचे नियोजन केवळ प्रसिद्धीपुरते रहाणार का, असा सवाल ठाणेकरांमधून उपस्थित केला जात आहे.
आरक्षणातील रस्ता दृष्टीपथास
मुंबई-पुणे महामार्गावरील पारसिकनगर येथे सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखडय़ातील मार्गाची यावेळी पहाणी करण्यात आली.या मार्गावरील अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना करण्यात आल्या. हा रस्ता पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांना थेट नाशिक महामार्ग गाठता येईल, असे आश्वासन यावेळी उपस्थितांनी दिले.