माहुलीची दुर्गभ्रमंती
आपल्या उज्ज्वल इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड, दुर्ग, किल्ल्यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. अनेक संस्था दुर्गसंवर्धनाचे काम सध्या करीत आहेत. त्यातीलच एक असणाऱ्या ठाण्यातील दुर्गसखा संस्थेतर्फे माहोली येथे ६ ते ८ मार्चदरम्यान दुर्गस्वच्छता, आदिवासी कातकरवाडी शाळेतील मुलांसोबत रंगपंचमी आणि शिवजयंती अशी दुर्गसंगोपन मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी ए/२, लवकुश, हायवे चेकनाका, कोपरी, ठाणे (पू.) या पत्त्यावर किंवा ९७७३५३७५३२ / ९७७३४२११८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

तांदूळ महोत्सव
शेतकऱ्याला आणि ग्राहकांना कोणत्याही दलालीशिवाय नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पालघर आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील उन्नती गार्डन मैदान, शिवाईनगर, पोखरण रोड न.१ येथे शुक्रवार, २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत ‘तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये विशेषत: वाडा कोलम, कोलम, मुरबाझीनी आदी प्रकारच्या तांदळाबरोबरच हातसडीचा तांदूळ, नाचणी, वरई, विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला, फळे; त्याचबरोबर पापड, लोणची, आदी उत्पादनेही विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
चित्रकला प्रदर्शन
ठाणे स्कूल ऑफ आर्ट व ठाणे कलाभवन यांच्या संयुक्त विद्यमाने कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वार्षिक चित्रकला प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापूरबावडी, बिग बजारजवळ, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे २४ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहे.

धुंद करणारा वाइन महोत्सव
गेले काही दिवस खाद्य महोत्सवांची रेलचेल ठाणे शहरामध्ये सुरू आहे. सध्या मुंबई-ठाण्यामध्ये ‘ऑल थिंग्ज नाइस वाइन वीक’ साजरा होत आहे. निरनिराळ्या रेस्टॉरंटमध्ये सध्या हा वाइन सप्ताह सुरू आहे. या सप्ताहामध्ये भाग घेतलेल्या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारच्या वाइन्सवर ३० टक्के सूट देण्यात आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील पिझ्झा एक्स्प्रेसमध्ये हा वाइन सप्ताह सुरू असून रविवार, २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी  http://www.allthingsnice.in या संकेतस्थळावर भेट द्या.

पं. जितेंद्र अभिषेकी स्मृतीवंदना
ठाणे- उत्कर्ष मंडळ, रघुनाथ फडके आणि स्वर्गीय गजानन कोळी जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १३वा गुरूवर्य प.जितेंद्र अभिषेकी स्मृतिवंदना कार्यक्रम शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता सहयोग मंदिर घंटाळी रोड, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पं. अंजर पोहनकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांना जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नाटय़, अभंग, भावगीत मैफलही होणार आहे. डॉ. नीला सत्यनारायण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मराठी दिन विशेष
हृदयी प्रीत जागते!
ठाणे- सुधीर फडके म्हणजे सर्व मराठी रसिकांचे लाडके बाबूजी. त्यांच्या गाण्यांची मोहिनी अजूनही मराठी मनावर आहे. त्यांच्याच संगीताचा वारसा त्यांचे पुत्र श्रीधर फडके समर्थपणे जपत आहेत. या तिघांनी गायिलेल्या प्रेमगीतांवर आधारित ‘हृदयी प्रीत जागते’ ही मैफल ठाण्यातील ऋतुरंग या संस्थेने शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतन येथे रात्री ८.३० वाजता आयोजित केली आहे. नव्या पिढीला या सदाबहार गाण्यांचा परिचय व्हावा म्हणून ॠतुरंगच्या विनय मराठे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली. या कार्यक्रमामध्ये धुंदी कळ्यांना, धुंद एकांत हा, सखी मंद झाल्या तारका, चंद्र आहे साक्षीला, जे वेड मजला लागले, फिटे अंधाराचे जाळे, स्वप्नात रंगले मी, तोच चंद्रमा नभात अशी अजरामर प्रेमगीते श्रीधर फडके, ‘आवाज महाराष्ट्राचा’ या स्पर्धेच्या विजेत्या धनश्री देशपांडे आणि शिल्पा पुणतांबेकर सादर करणार आहेत.

थंड..थंडाई
होळीच्या होमास साक्षी ठेवून थंडीला अलविदा केल्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्याची काहिली कमी करण्यासाठी थंडाई हवीहवीशी वाटू लागते. होळीच्या निमित्ताने रंगांची उधळण केली जात असतानाच थंडाईचीही हटकून आठवण होत असते. थंडाई बनवण्यासाठी दरवेळी महाराज उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे आता कोरम मॉलने खास महिलांसाठी घरच्या घरी थंडाई बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये थंडाईबरोबरच नारळी वडी आणि मासपोहे बनवण्याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बुधवार, ४ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी कंपाऊंड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प) येथे ही कार्यशाळा भरविण्यात आली आहे.

एक कविता तुमची, एक कुसुमाग्रजांची
सार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमालेअंतर्गत ‘एक कविता तुमची व एक कुसुमाग्रजांची’ या कार्यक्रमाचे आयोजन मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मान्यवर कवींचे काव्यवाचन व कथावाचनही होणार आहे. शुक्रवार २७ फेब्रुवारीला सार्वजनिक वाचनालय सभागृह, शिवाजी चौक, कल्याण (प.) येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शक मदन जोशी, कलाकार मानसी जोशी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कुसुमाग्रज दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन
ओम प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज या दृक्श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज यांचे काव्यवाचन, त्यांच्या काव्यरचना आणि त्यांच्या काही निवडक नाटकांमधील नाटय़प्रवेश यावर आधारित हा कार्यक्रम आहे. शुक्रवारी २७ फेब्रुवारीला सर्वेश सभागृह, तळमजला, टिळक रोड, डोंबिवली (पू.) येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.