Bank Employee Quits Government Job: सरकारी नोकरी म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित नोकरी. एकदा चिकटलो की निवृत्तीपर्यंत निवांत, थेट पेन्शन घेऊनच बाहेर पडायचं… अशी धारणा भारतातील सर्वच मध्यमवर्गीयांमध्ये दिसते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वच राज्यात सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तरुण धडपड करताना दिसतात. नोकरी लागल्यानंतर समाजात मिळणारी प्रतिष्ठा, आर्थिक सुबत्ता, सुरक्षित भविष्याची हमी.. हे सुख प्रत्येकाला खुणावत असतं. पण आता काळ बदलला असून सरकारी नोकरी सोडण्याचं प्रमाणही वाढत आहे. एका ३९ वर्षीय तरूणानं रेडिटवर पोस्ट करून त्याच्या बँकेच्या नोकरीचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

आरोग्याच्या समस्या, तीव्र ताण आणि वैयक्तिक आयुष्य पणाला लागल्यामुळं नोकरी सोडतोय, असं या तरुणानं रेडिटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं. रेडिट फोरमवरील r/IndianWorkplace या हँडलवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तसंच सरकारी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडण्याचा निर्णय का घेतला? याचं सविस्तर विश्लेषण पोस्टकर्त्यानं केलं आहे.

तरूणानं म्हटलं, “मी ३९ वर्षांचा आहे. सरकारी बँकेच्या नोकरीत माझी घुसमट होत होती. मला नाही वाटत मी आणखी काही काळ हे काम करू शकेन.” या पोस्टबरोबर तरूणानं त्याच्या बँकेतील फोटोही शेअर केला आहे.

अखिल भारतीय स्तरावर तीन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ही नोकरी मिळाली होती, असेही या तरुणानं नमूद केलं. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत नोकरी मिळवणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून हे चित्र बदलत असल्याचं तरुणानं म्हटलं.

“सरकारी बँकेतील नोकरीमुळं स्थिरता, चांगलं घर, गाडी, स्थिर पगार आणि समाजात आदर मिळतो, असं वाटलं होतं. पण आता वास्तव बदललं आहे. आता या नोकरीमुळं उच्च रक्तदाब, थायरॉईड समस्या आणि फॅटी लिव्हर आजाराचा सामना करावा लागत आहे. सततच्या बदल्यांमुळं दुर्गम भागात स्थलांतर, सेल्स टार्गेट आणि रोज १२ तास काम करावं लागत आहे”, अशी व्यथा या तरूणांनं मांडली.

विमा उत्पादनं विकण्यास आम्हाला भाग पाडलं जात आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी काम करावं लागत आहे. बॉसेसच्या अवास्तव इच्छा पूर्ण करता करता नाकी नऊ येत आहेत. मी स्वतःला न्याय देऊ शकेन, असं मला आता वाटत नाही. माझ्या सहकाऱ्यांचीही हीच अवस्था असून ते निराशेच्या वाटेवर असल्याचे या तरुणानं पोस्टमध्ये नमूद केलं.

या तरुणानं पुढं म्हटलं, “मी आता कामावर जाणं थांबवलं आहे. माझं वेतन खंडीत केलं जाईल. माझा आर्थिक संघर्ष सुरू होईल. याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही माझ्या जीवनातला आनंद मी मिळवू शकेन, असा मला विश्वास आहे.”

या पोस्टला रेडिटवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी सदर तरुणाच्या भावनेचा आदर केला असून त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांच्या जीवनात कामाच्या ठिकाणी ताण असून ते याच्याशी झुंजत आहेत, असं अनेकांनी सांगितलं.

एका युजरनं लिहिलं की, मी आयटी क्षेत्रात काम करत असून मला उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवली आहे. ईएमआय थकीत आहेत, टाळेबंदीची (लेऑफ) भीती आहे. त्यामुळं मला वाटायचं यापेक्षा सरकारी नोकरी मिळाली असती तर बरं झालं असतं. पण आता जेव्हा तुमची पोस्ट वाचतोय, तर ‘पल्याडल्या बाजूचं गवत अधिक हिरवं आहे’, या म्हणीची प्रचिती येते.