मासिक पाळी ही प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. शरीरात होणाऱ्या जैविक बदलांमुळे दर महिन्याला गर्भाशयातून रक्तस्राव होतो आणि यालाच मासिक पाळी म्हणतात. ही प्रक्रिया स्त्रीच्या प्रजननक्षमतेचं प्रतीक असून, तिच्या शारीरिक व मानसिक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा दर्शवते. मात्र समाजात पाळीविषयी अजूनही गैरसमज, संकोच असं वातावरण आहे. एकीकडे आजही मासिक पाळी येणे म्हणजे अपवित्र मानले जाते, महिलांना चार दिवस बाजूला बसवले जाते, सणवार साजरे करता येत नाही तर दुसरीकडे, काही ठिकाणी मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचा उत्सव साजरा करून स्त्रीत्वाचा गौरव केला जातो. मासिक पाळीकडे पाहण्याचा हा सकारात्मक दृष्टिकोन स्त्रीत्वाचा सन्मान करतो.

केरळमधील एका कुटुंबाने आपल्या मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला असून, या खास क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ‘रेश्मा सुरेश’ यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल ६.९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमधून स्त्रीत्व, संस्कार आणि कुटुंबातील स्नेह यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.

व्हिडिओमध्ये त्या मुलीचा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेला समारंभ दाखवण्यात आला आहे. सोहळ्याची सुरुवात दूधस्नानाने होते. त्यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ महिला तिला फुलांची माळ घालतात आणि आरती करतात. या विधीनंतर स्त्री-पुरुष सदस्य तिच्या अंगावर हळदीचा लेप लावतात—हा विधी शुभ आणि मंगलमयतेचे प्रतीक मानला जातो.

सोहळा संपल्यानंतर मुलगी सुंदर पारंपरिक पेहरावात सजते, आणि कुटुंबीय तिला गोड खाऊ घालून तिच्या नव्या प्रवासाचे स्वागत करतात. व्हिडीओमध्ये कुटुंबातील प्रेम, सन्मान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसतो.

सोशल मीडियावर या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या सोहळ्याचे कौतुक करत, अशा संस्कारांनी ‘स्त्रीत्वाचा सन्मान’ होत असल्याचं मत व्यक्त केलं. एका वापरकर्त्याने लिहिलं, “ती फुलतेय, वाढतेय, चमकतेय… स्त्रीत्वात प्रवेश करण्याचा हा पवित्र क्षण खूप सुंदर आहे. प्रत्येक मुलीला अशीच ऊब आणि सन्मान मिळो.”

दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, “लाज नाही, संकोच नाही — फक्त एका मुलीचं स्त्रीत्वात रुपांतर. किती सुंदर!” तर एका कमेंटमध्ये म्हटलं आहे, “भावाने बहिणीच्या डोक्यावर दिलेला प्रेमळ चुंबन आणि तिचा हात धरलेला क्षण — या घराने मुलांना किती सुंदर संस्कार दिले आहेत, हेच दाखवतो.”

अनेकांनी लिहिलं की, अशा सणांमुळे समाजात मोठा बदल होत आहे — कारण अनेकांना पहिल्या मासिक पाळीच्या वेळी लाज आणि भीती शिकवली गेली, साजरी केली नाही. पण आता या कुटुंबांनी दाखवून दिलं की, हा क्षण लपवायचा नसून साजरा करायचा आहे.

या व्हिडिओतील त्या मुलीचा भाऊ विशेष चर्चेत आला आहे. त्याने बहिणीबद्दल दाखवलेला स्नेह, काळजी आणि सन्मान पाहून अनेक वापरकर्त्यांनी लिहिलं, “असा भाऊ प्रत्येक बहिणीला लाभो!”

यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात ‘आयुषा’ नावाच्या मुलीचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या सोहळ्यातही कुटुंबाने आनंदाश्रूंनी तिचं स्वागत केलं होतं. या सर्व प्रसंगांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे — मासिक पाळी हा लज्जास्पद नव्हे, अभिमानाचा विषय आहे. पहिल्या मासिक पाळीचा क्षण हा विकास, सन्मान आणि नात्यातील आपुलकीचा उत्सव म्हणून साजरा व्हावा, हा विचार आता अधिकाधिक लोकांच्या मनात पक्कं स्थान मिळवू लागला आहे.