Viral video: अनेक शहरांमध्ये रस्त्यावरचे वादविवाद, रागाचे उद्रेक आणि क्षुल्लक कारणांवरून होणारी भांडणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. ट्रॅफिकची गर्दी असताना लोक पटकन चिडतात, त्यामुळे छोटा अपघातसुद्धा मोठ्या भांडणात बदलतो. तसाच प्रकार बयप्पनहल्ली मेट्रो स्थानकाजवळ झाला. एका हलक्या धडकेनंतर महिला स्कूटर चालकाने जागेवरच मोठा वाद सुरू केला आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला.
बेंगळुरूच्या बयप्पनहल्ली भागात स्वामी विवेकानंद मेट्रो स्थानकाजवळ काल सकाळी मोठा गोंधळ झाला. त्या भागात नेहमीच ट्रॅफिक जास्त असतं, पण एका छोट्या अपघातानंतर महिला स्कूटर चालकाने रस्त्यावरच भांडण सुरू केले आणि त्यामुळे जवळपास एक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झाला. या प्रकारामुळे शहरातील वाढती वाहतूक, लोकांचं रस्त्यावरचं वागणं आणि नियम न पाळण्याचे प्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला स्कूटरवरून चुकीच्या दिशेने येताना दिसते. तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका ऑटोसोबत तिची हलकी धडक होते. अपघात छोटा असतानाही ती शांत न राहता जागेवरच जोरात भांडायला लागते. हा सगळा प्रकार रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर टाकला आहे.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओमध्ये दिसते की, स्कूटरला ऑटोची हलकी धडक बसताच ती महिला अचानक ऑटोचालकावर ओरडायला लागते. चूक तिची असतानाही ती रिक्षाचालकावरच राग काढताना दिसते, त्यामुळे काही मिनिटांतच रस्त्यावरचा ट्रॅफिक पूर्ण थांबतो. थोड्याच वेळात एक ट्रॅफिक पोलिस तिथे येतो आणि दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण, महिला पोलिसाचे बोलणे ऐकत नाही आणि अजून जास्त वाद घालायला लागते; त्यामुळे पाठीमागे मोठी वाहनांची रांग लागते. व्हिडीओमध्ये इतर वाहनचालक त्रासलेले दिसतात आणि सतत हॉर्न वाजवत असतात. छोट्या अपघातामुळे तब्बल एक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटिझन्सनी महिलेवर खूप टीका केली. अनेकांनी तिचे वागणे नादान आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले, “चूक तिची आणि रागसुद्धा तिचाच! चुकीच्या दिशेने येऊन अपघात केला तरी तिने ऑटोचालकावरच ओरडायला सुरुवात केली.” दुसऱ्या युजरने कडक कारवाईची मागणी करत लिहिले, “रस्त्यावर उलट दिशेने गाडी चालवणाऱ्यांना मोठा दंड झाला पाहिजे, एवढा ट्रॅफिक जाम केला त्याची जबाबदारी कोण घेणार?” काही जणांनी शहरातील ट्रॅफिक शिस्तीवरच प्रश्न उपस्थित केले आणि म्हणाले“ड्रंक अँड ड्राइव्हसारखे कठोर नियम अशा निष्काळजी वाहनचालकांसाठीही असायला हवेत, नाहीतर असे प्रकार कमी होणार नाहीत.”
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इंस्टाग्राम bengaluru_diaries_ अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही लोकांनी मात्र व्हिडीओवरून महिला पूर्णपणे चुकीची आहे का हे तपासणे गरजेचे असल्याचेही सांगितले. पण, मोठ्या रस्त्यावर विनाकारण वाद घालणे, इतरांची वाट अडवणे आणि नियम तोडणे हे चुकीचेच असल्याचे सर्वांनी मान्य केले.
