Benefits of pomegranate leaf: डाळिंब हे फळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल्स, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, डाळिंबाचे पानदेखील तितकेच औषधी गुणांनी भरलेले असते? विशेषत: ओरल हेल्थ म्हणजेच दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी डाळिंबाचे पान एक नैसर्गिक औषध मानले जाते.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पिवळसर दात, दातांमध्ये कीड लागणे, तोंडाला दुर्गंधी येणे किंवा कधी कधी दातदुखी होणे हे अनेकांचे सामान्य प्रश्न झाले आहेत. मार्केटमध्ये अनेक महागडे टूथपेस्ट्स आणि माउथवॉश उपलब्ध आहेत, पण त्यांचा परिणाम तात्पुरता असतो. अशा वेळी घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित व प्रभावी ठरतात. डाळिंबाच्या पानांपासून बनवलेले दंतमंजन हा त्याचाच एक उत्तम पर्याय आहे.

डाळिंबाच्या पानांमध्ये काय असते?

‘सायन्स डायरेक्ट’ यांच्या मते डाळिंबाच्या पानांमध्ये टॅनिन, फिनोलिक अ‍ॅसिड, फ्लेव्होनॉइड्ससह अनेक बायोअ‍ॅक्टिव्ह कंपाउंड्स आढळतात. हे घटक शरीरासाठी जंतूनाशक व सूज कमी करणारे असतात, त्यामुळे हे पान दात व हिरड्यांच्या समस्या कमी करण्यात मदत करतात.

दंतमंजन बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • डाळिंबाची ताजी पाने
  • लवंग
  • सैंधव मीठ
  • बेकिंग सोडा
  • दंतमंजन बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम डाळिंबाची पाने स्वच्छ धुऊन उन्हात चांगली कोरडी करावी. ही पाने बारीक करून त्यांची पावडर तयार करून घ्यावी. त्याचप्रमाणे लवंग बारीक वाटून पावडर बनवावी. आता या दोन्ही पावडरमध्ये सैंधव मीठ आणि थोडा बेकिंग सोडा मिसळावा.सर्व मिश्रण एकत्र करून हवाबंद डब्यात साठवून ठेवावे.

डाळिंबाच्या पानांचे दंतमंजन वापरण्याचे फायदे

१. पिवळसर दात स्वच्छ होतात – डाळिंबाच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक घटक दातांवरील पिवळसर थर कमी करतात.

२. तोंडाची दुर्गंधी कमी होते – जंतूनाशक गुणधर्मांमुळे श्वासावर नियंत्रण मिळते.

३. दातांमधील कीड कमी होते – नैसर्गिक संयुगांमुळे दातांवर जीवाणूंची वाढ थांबते.

४. दातदुखीला आराम मिळतो – सूज कमी करणाऱ्या गुणधर्मांमुळे दात व हिरड्यांच्या वेदना कमी होतात.

५. ओरल हेल्थ मजबूत होते – नियमित वापरामुळे हिरड्यांचा त्रास कमी होऊन तोंडाची एकूण स्वच्छता राखली जाते.

घरगुती पद्धतीने तयार केलेले हे दंतमंजन केवळ स्वस्त आणि सोपे नाही, तर कोणतेही साइड-इफेक्ट्स नसलेले आहे. ज्या समस्या आपल्याला नेहमी त्रास देतात जसे की पिवळसर दात, दातदुखी त्यावर हा एक नैसर्गिक उपाय आहे. मात्र, जास्त गंभीर समस्या असल्यास दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.