Darbhanga Airport Viral Video: कल्पना करा… विमान उड्डाणासाठी तयार आहे, प्रवाशांची रांग लागलेली आहे आणि कॉकपिटमधून पायलट बाहेरचं दृश्य पाहत आहे. तेवढ्यात त्याच्या नजरेस असं काहीतरी पडतं, ज्यामुळे तो हसायला लागतो आणि लगेचच मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू करतो. काही क्षणांत टिपलेला तो नऊ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच इंटरनेटवर खळबळ उडते. हजारोंच्या कमेंट्स येतात, वाद सुरू होतो… नेमकं त्या व्हिडीओमध्ये काय होतं? आणि का पेटली एवढी मोठी चर्चा?

बिहारमधील दरभंगा विमानतळावर नुकताच घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रवासी विमान उड्डाणासाठी सज्ज होतं, प्रवाशांची रांग लागत होती, तेवढ्यात एक अनपेक्षित प्रसंग घडला आणि तो कॅमेऱ्यात कैद होताच संपूर्ण देशभरात यावर वाद निर्माण झाला.

घडलं असं की, विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेल्या पायलटची नजर अचानक बाहेर गेली आणि त्याला दिसलं की, विमानासमोरच एका वयोवृद्ध व्यक्तीनं बाजूच्या झुडपात बसून लघुशंका करण्यास सुरुवात केली आहे. हे दृश्य पाहताच पायलट हसू थांबवू शकला नाही आणि त्यानं लगेचच मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करून, तो सोशल मीडियावर शेअर केला. अवघ्या नऊ सेकंदांची ही क्लिप क्षणातच व्हायरल झाली आणि त्यावर प्रचंड चर्चा सुरू झाली.

सोशल मीडियावर दोन गट – कोण बरोबर?

हा व्हिडीओ समोर येताच नेटिझन्स दोन गटांत विभागले गेले आहेत. काही जणांचा ठाम दावा आहे की, वयोवृद्ध व्यक्तींना आरोग्याच्या कारणामुळे मूत्राशयावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते आणि त्यामुळे त्यांची थट्टा करणे योग्य नाही. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, एवढ्या मोठ्या विमानतळावर सार्वजनिक शौचालय असताना कोणी अशा प्रकारे उघडपणे लघुशंका करणे ही लाजिरवाणी बाब आहे.

वादाला उधाण – कमेंट्सची बरसात

‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ पोस्ट होताच आतापर्यंत दोन लाख ७० हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तसेच त्याला ४,५०० हून अधिक लाइक्स मिळाले असून, तब्बल २०० पेक्षा जास्त लोक कमेंट्समधून आपली मतं मांडत आहेत. कोणी म्हणतं, “पायलटनं वयोवृद्ध व्यक्तीची खिल्ली उडवली, हे चुकीचं आहे”, तर कोणी लिहितं– “हा प्रकार म्हणजे नागरी भानच नाही, सिविक सेन्सचा पूर्ण अभाव.”

दरभंगा विमानतळावरचा हा प्रकार आता चर्चेचा वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. काहींना हा व्हिडीओ हास्यास्पद वाटतो, तर काहींना तो दुःखद आणि विचार करायला लावणारा. एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियान’ असूनही अजूनही सार्वजनिक ठिकाणी शौच वा लघुशंका करण्याची सवय काहींमध्ये कायम असल्याचं या घटनेतून अधोरेखित होतं.

तुम्हालाही काय वाटतं? पायलट चुकीचा की वयोवृद्ध व्यक्ती? की दोघेही?

येथे पाहा व्हिडीओ