Chinese Delivery Boy Heart Touching Viral Video: शिक्षणाच्या अभावामुळे किंवा इतर अनेक अडचणींमुळे बऱ्याच लोकांना डिलिव्हरी बॉयचं काम करावं लागतं. यात डिलिव्हरी बॉयचं काम म्हणजे सतत फिरणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्सल, वस्तू पोहोचवणं; जे दिसायला जरी सोपं वाटत असलं तरी सोपं नाही, अनेकांना या कामाचा कंटाळा येऊ लागतो. यावेळी आई-वडिलांचं ऐकून शिकलो असतो तर बरं झालं असतं असं वाटू लागतं. पण, हातातून वेळ निघून गेलेली असते. सध्या अशाच एका चीनमधील डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून आयुष्यात शिक्षण किती महत्त्वाचं आहे याची जाणीव होईल, तसेच तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल.

डिलिव्हरी बॉयला कमी वयात शिक्षण सोडल्याचा होतोय पश्चाताप (Chinese Delivery Boy Crying Video)

व्हिडीओत एक डिलिव्हरी बॉय आयुष्यातील अडचणी आणि कमी वयात शिक्षण सोडल्याबद्दल पश्चाताप करत रडताना दिसतोय. वाढती महागाई आणि कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, याविषयीदेखील त्याने भाष्य केलं आहे.

व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणतो की, जर त्याला आयुष्यात पुन्हा संधी मिळाली तर तो खूप मेहनत घेऊन अभ्यास करेल. त्याला पश्चात्ताप होतो की, त्याने त्याच्या शिक्षकांचे ऐकले नाही आणि खूप लवकर शाळा सोडली. शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि त्याच्या पालकांना चांगले आयुष्य देऊ न शकल्याच्या वेदनांबद्दल सांगत तो ढसाढसा रडतोय.

तो म्हणतो, ‘आता मी दररोज १० तास फूड डिलिव्हरी करतो, मी खूप थकतो, कुत्र्यासारखा थकतो. मी क्षणभरही विश्रांती घेऊ शकत नाही, कारण मी थांबलो तर मला आयुष्यात उपाशी राहण्याची शिक्षा भागावी लागू शकते.’

“मी माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगूही शकत नाही” (Chinese Delivery Boy Viral Video)

तो पुढे म्हणातो की, ‘मी माझ्या पालकांना तसं आयुष्य देऊ शकत नाही, जे त्यांना हवं आहे. मी माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगूही शकत नाही. हे विचार करून माझं मन तुटतं. पण मी माझी कहाणी कोणाला सांगू?’ हा व्हिडीओ त्या सर्व लोकांचे दुःख दाखवतो, जे खूप कमी पैशांत काम करतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल.

डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून अनेक लोक भावूक झालेत. एका युजरने लिहिले की, ‘नेहमीच उत्तम पद्धतीने वागा, कारण प्रत्येक जण स्वतःची लढाई लढत असतो.’ दुसऱ्याने म्हटले की, ‘आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देईल अशी माझी इच्छा आहे.’ तिसऱ्याने म्हटले की, ‘रडू नकोस, आजकाल सुशिक्षित लोकांचीही अशीच परिस्थिती आहे.’