Rajasthan Couple Reel Viral :  रील बनवण्यासाठी हल्ली लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. या रील्सच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण, त्यातूनही लोक धडा घेताना दिसत नाही. लोक रीलसाठी कधी स्वत:चा तर कधी इतरांचा जीवदेखील धोक्यात टाकायला अजिबात घाबरत नाहीत. यात हल्ली रेल्वेस्थानक, ट्रेनच्या पटरीवरही अगदी बिधास्तपणे रील व्हिडीओ शूट करत असतात. अशाचप्रकारे राजस्थानमधून एक व्हिडीओ समोर आला आहे, जिथे एक जोडपं सुंदर दृश्य शूट करण्यासाठी म्हणून रेल्वे ब्रिजवर चढतात, तितक्यात समोरून एक भरधाव ट्रेन येते; यानंतर पुढे जे काही घडते ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना राजस्थानमधील काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोराम घाटात घडली आहे. जिथे पर्यटक फोटो, रील्ससाठी जीव धोक्यात घालताना दिसतात. अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन अपघाताला बळी पडतात. शनिवारीही गोराम घाटात एक जोडपं तेथील सुंदर नजारा पाहण्यासाठी आले होते, यावेळी रील बनवताना त्यांचा एक गंभीर अपघात झाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ट्रेन जवळ येताच मारली १४० फूट उंच पुलावरून उडी

गोराम घाट पुलावर राहुल नावाचा व्यक्ती त्याची पत्नी जान्हवीबरोबर रील बनवत होता. दोघेही रील बनवण्यात इतके मग्न होते की, त्यांना ट्रेन आल्याचेही भान राहिले नाही. यावेळी भरधाव ट्रेन अगदी जवळ आल्यावर त्यांना हॉर्नचा आवाज आला. ज्यानंतर दोघांनी घाबरून १४० फूट उंच पुलावरून उडी मारली. मात्र, लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली.

More Viral Video Stories : वर्गात शिकवत होती शिक्षिका, अचानक फिरता पंखा पडला खाली अन्…; धक्कादायक घटनेचा VIDEO VIRAL

ट्रेन येत असल्याचे पाहून दोघे इतके घाबरले की, त्यांनी जीव वाचवण्यासाठी पुलावरून उडी मारली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, लोको पायलटने हे जोडपे उभ्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच ट्रेन थांबवली. जोडप्याने उडी मारल्यानंतर लोको पायलट आणि गार्डसह अनेक लोक जोडप्यापर्यंत पोहोचले. जखमी अवस्थेत त्यांना ट्रेनमध्ये चढवले आणि नंतर फुलद स्टेशनवर आणून रुग्णवाहिकेने सिरियारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने आता त्यांना उपचारांसाठी पालीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने दोघांचे प्राण वाचले. या भागात मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी येतात. यावेळी फोटो आणि रील्सच्या नादात पर्यटक धोकादायक ठिकाणी पोहोचतात, असे सांगण्यात येत आहे.