Crocodile Stuck Under Truck Video Viral : मगर हा किती खतरनाक प्राणी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात तो दुसऱ्या प्राण्याचे किंवा माणसाचे दोन तुकडे करू शकतो. तिच्या ताकदीपुढे भल्याभल्या प्राण्यांची ताकद फोल ठरते. सध्या ऑस्ट्रेलियातील काकाडू राष्ट्रीय उद्यानातील अशाच एका महाकाय मगरीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

ऑस्ट्रेलियात सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे येथील अनेक नद्यांना पूर आला आहे. अशाच एक प्रसिद्ध नदीवरील रस्ता ओलांडून एक ट्रक जात होता. यावेळी नदीला पूर आल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी जमा झाले होते. त्यामुळे या पाण्यासह एक महाकाय मगरही नदीतून बाहेर आली आणि थेट ती ट्रकच्या चाकाजवळ आली. त्यानंतर पुढे असे काही घडले की, ते पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक भरपावसात पूरग्रस्त नदीवरील रस्ता ओलांडत होता, याच वेळी पुराच्या पाण्यासह रस्त्यावर वाहून आलेली एक महाकाय मगर ट्कखालून चक्क ट्रकसमोर येते. समोरील दृश्य पाहून चालकही खूप घाबरतो आणि तो ट्रक रस्त्यातच थांबवतो. काही सेकंदांनंतर मगर ट्रकच्या खालून बाहेर पडते आणि पाण्यात जाते. पाण्यात जाण्याआधी मगर एकदा मागे वळते आणि ट्रकवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते; पण तोपर्यंत ट्रक पुढे निघून गेलेला असतो. सुदैवाने चालक घटनेच्या वेळी ट्रकखाली उतरला नाही; अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता.

हा व्हिडीओ मॅटेओ मास्तराटीसी नावाच्या व्यक्तीने शूट केला आहे. त्याने एका न्यूज चॅनेलशी बोलताना म्हटले की, माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीही मगरीला वाहनाखाली अडकताना पाहिले नव्हते. तो पुढे म्हणाला की, ट्रकखाली एखादा प्राणी आहे याची ड्रायव्हरला कल्पना नव्हती. कारण- खूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्याला ती मगर दिसली नाही; पण त्याचा गाडी थांबवण्याचा निर्णय योग्य होता.

पण, या व्हिडीओवर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकाने लिहिले की, अशा क्रॉसिंगवर थांबणे धोकादायक आहे. कारण- मगरी नेहमीच तिथे असतात. दुसऱ्याने लिहिले की, हा पूर नाही, तर ऑस्ट्रेलियाचे आकर्षण आहे. तर तिसऱ्याने म्हटले की, ड्रायव्हरने खाली उतरून पाहिले नाही हे चांगले केले.