बेंगळुरूमधील बिशप कॉटन मुलींच्या शाळेत एक अनोखा आणि भावनिक क्षण अनुभवण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी अशा व्यक्तीला निरोप दिला, ज्यांनी जवळपास चार दशकं या शाळेच्या आठवणींमध्ये आपली ओळख कायम ठेवली होती. ‘दास अंकल’ म्हणून ओळखले जाणारे हे कर्मचारी दररोज शाळेची घंटा वाजवण्याचं काम करत होते, पण या साध्या कामामागे, ते शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दिवसाचा एक भाग बनले होते.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘@Amikutty_’ या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओत बिशप कॉटन मुलींच्या शाळेमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र जमले आहेत. वातावरणात आनंद, भावनिकता आणि कृतज्ञता या सगळ्याच भावना मिसळल्या आहेत. दास अंकल आपल्या अंतिम वेळेसाठी घंटा वाजवतात आणि त्या क्षणी संपूर्ण शाळा टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करते. त्यांच्या चेहऱ्यावरील हलकेसे हास्य आणि डोळ्यातील भावनिक क्षण पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

त्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे, “३८ वर्षांनंतर दास अंकल यांनी शेवटची घंटा वाजवली. प्रत्येक सकाळ, प्रत्येक आठवण त्यांच्या घंटेसोबत जोडली गेली आहे. त्यांचं हास्य, त्यांचं शांत काम आणि त्यांची उपस्थिती ही शाळेच्या धडधडणाऱ्या हृदयाचा एक भाग होती. आज त्यांनी ती शेवटची घंटा वाजवली आणि आम्ही त्यांचा सन्मान केला, वेळेला ओळख देणाऱ्या या दास अंकलचा.”

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला आणि हजारो लोकांनी तो पाहिला आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सध्याचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नेटिझन्स सर्वांनी व्हिडीओअंतर्गत दास अंकल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आणि या छोट्या पण अर्थपूर्ण निरोपाबद्दल शाळेचे कौतुक केले.

एका युजरने लिहिलं, “आत्ता जाणवलं की भारतभरात अशा कित्येक दास अंकलनी आपली शेवटची घंटा वाजवली असेल — कोणी पाहिलं नाही, ओळखलं नाही, पण ते आपल्या शाळेच्या इतिहासाचा भाग आहेत. दास अंकल भाग्यवान आहेत की त्यांचा सन्मान झाला.”दुसऱ्या युजरने म्हटलं, “शाळेने आणि विद्यार्थ्यांनी दिलेला हा आदर पाहून मन भरून आलं. ही आठवण ते आयुष्यभर जपतील.” तर आणखी एका माजी विद्यार्थिनीने आठवण सांगितली, “कितीदा मी त्यांना विनंती केली होती की घंटा लवकर वाजवा! पण, ते नेहमीच हसून दुर्लक्ष करायचे. आज त्यांना शेवटची घंटा वाजवताना पाहून डोळ्यात पाणी आले.”

हा फक्त एक व्हायरल व्हि़डीओ नाही, तर ती शाळेच्या प्रत्येक आठवणीचा एक भाग आहे, जिथे वेळ मोजणारी व्यक्तीच एक दिवस काळाच्या ओघात आठवण बनते.