Swedish Man Cleans Indian Streets Viral Video : भारतात अनेक परदेशी पर्यटक पर्यटनासाठी येतात. येथील अनेक धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना ते भेट देतात. या भेटीदरम्यान अनेकदा त्यांना चांगल्या-वाईट घटनांचे अनुभव येतात, ज्याचे व्हिडीओ, फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाचप्रकारे एक विदेशी पर्यटक भारतात पर्यटनासाठी आला होता. पण, भारतात आल्यानंतर त्याला अशा काही समस्या दिसतात, ज्या सुधारण्यासाठी तो स्वत: पुढाकार घेतो. भारतातील अनेक पर्यटनस्थळांवर अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य दिसून येते, हेच घाणीचे साम्राज्य संपवण्यासाठी आणि भारत स्वच्छता, निरोगी ठेवण्यासाठी एका विदेशी पर्यटकाने पुढाकार घेतला आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. अनेक जण त्याच्या या पुढाकाराचे तोंडभरून कौतुक करतायत; तर काही जण ही भारतीयांसाठी खरंच लज्जास्पद गोष्ट असल्याचे म्हणत आहेत.

भारत स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणारा हा विदेशी पर्यटक स्वीडनचा आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ‘4cleanindia’ नावाचे एक पेज आहे, जिथे त्याचे भारतातील रस्ते, उद्याने आणि पर्यटनस्थळे स्वच्छ करतानाचे अनेक व्हिडीओ आहेत. या व्यक्तीचे हे व्हिडीओ केवळ स्वच्छतेला प्रोत्साहन देत नाहीत तर लोक त्यात कसे योगदान देऊ शकतात हे देखील सांगत आहे.

विदेशी पर्यटकाच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून या स्वीडिश पर्यटकाने ‘एक दिवस, एक रस्ता’ नावाचे एक अभियान सुरू केले आहे, ज्या माध्यमातून तो सात दिवस दररोज कचऱ्याने भरलेला रस्ता, गल्ली निवडतो आणि तेथील परिसर स्वच्छ करतो. यासह तो रस्ता पूर्वी कसा दिसत होता आणि स्वच्छतेनंतर आता कसा दिसतो, याचा व्हिडीओही शेअर करत असतो.

रस्ते आणि गल्ल्या स्वच्छ करताना तो अनेकदा ये-जा करणाऱ्यांशी बोलत त्यांना स्वच्छतेची जबाबदारी समजावून सांगतो. एका व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की, ‘आपल्याला भारत स्वच्छ ठेवायचा आहे’, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो फिरायला जाताना हातात कचऱ्याची पिशवी घेत वाटेत कचरा गोळा करतो.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, ‘चालण्याने किती फरक पडू शकतो? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फिरायला जाल तेव्हा स्वतःबरोबर कचऱ्याची पिशवी घेऊन जा आणि स्वतः पाहा.’

एका व्हिडीओमध्ये त्याने भारताचे खूप कौतुक केले आहे. तो म्हणाला की, भारत हा सोशल मीडियावर दिसतो तसा नाही, तर आपण तो बनवू तोच भारत असेल. या अद्भुत उपक्रमाने या स्वीडिश माणसाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरही लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत.