Flood Viral Video Fact Check : ‘लाइटहाउस जर्नालिझम’ला एक व्हिडीओ भारतात मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळले. हा व्हिडीओ भारतातील अलीकडील पूरसदृश परिस्थितीशी जोडून पंजाब आणि उत्तराखंडमधील असल्याचा दावा करत शेअर केला आहे. पण, तपासणीदरम्यान आम्हाला असे आढळून आले की, हा व्हिडीओ जुना असून पाकिस्तानमधील आहे, जो भारतातील असल्याचे सांगून खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (युजर) @IndrajitGurjar इंद्रजीत गुर्जरने आपल्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ खोट्या दाव्यासह शेअर केला आणि ‘पंजाबमध्ये पावसामुळे सात जिल्हे पूरग्रस्त झाले आहेत. वेळेवर मदत न मिळाल्याने एक संपूर्ण कुटुंब पाण्यात बुडून मृत्युमुखी गेले’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
इतर युजर्सही हा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा करून शेअर करीत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओमधील काही स्क्रीनशॉट घेऊन ‘रिव्हर्स इमेज सर्च’ करून तपासणी सुरू केली.
आम्हाला जुलैमध्ये इन्स्टाग्रामवर अपलोड केलेली एक ‘रील’ मिळाली. कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचे म्हटले होते.
आम्हाला theworldwatch.com वर एक बातमी मिळाली.
https://theworldwatch.com/videos/1632543/full-video-footage-nine-drown-as-flooded-swat-river-sweeps-18-tourists
बातमीनुसार : शुक्रवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तूुनख्वा येथे स्वात नदीला पूर आला. नदीच्या जोरदार प्रवाहात एकूण १८ जण वाहून गेले, त्यातल्या १० जण एकाच कुटुंबातील होते. त्यातील नऊ पर्यटक बुडाले; तर सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, बचाव पथकांनी तीन जणांना नदीतून जिवंत बाहेर काढले.
आम्हाला ‘आवाज इंडिया’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर दोन महिन्यांपूर्वी अपलोड झालेली एक बातमीदेखील मिळाली.
‘डोमेल न्यूज’ने (Domel News) देखील याच संदर्भात एक बातमी अपलोड केली होती.
२७ जून २०२५ रोजी ‘अल जझीरा’ने (Al Jazeera) अपलोड केलेला एक व्हिडीओ अहवालही आम्हाला सापडला.
निष्कर्ष – पाकिस्तानमधील स्वात नदीच्या पुरात एकाच कुटुंबातील अनेक लोक वाहून जात असल्याचा जुना व्हिडीओ भारतातील म्हणून शेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हायरल दावा खोटा आहे.