परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही किंवा अभ्यास करायला वेळ मिळत नाही म्हणून ते चुकीचा मार्ग निवडतात. असे विद्यार्थी परीक्षेत पास होण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधून काढतात. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षक रंगेहाथ पकडतातही. पण, तरीही विद्यार्थी कॉपी करण्याचे एकापेक्षा एक भन्नाट जुगाड शोधून काढतात. अशाच प्रकारे कॉपी करण्याचा एक अनोखा प्रकार एका तरुणीने शेअर केला आहे.; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणीही विचार केला नसेल की, अशा प्रकारेही परीक्षेत कॉपी केली जाऊ शकते.
पायांवर अगदी छोट्या छोट्या अक्षरांत लिहिली उत्तरे
दरवर्षी लाखो मुले अभ्यास करतात आणि शेवटी परीक्षेद्वारे त्यांची शैक्षणिक क्षमता तपासली जाते. या परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलेही रात्रंदिवस मेहनत घेतात. मात्र, काही विद्यार्थी असे असतात की, जे फसवणूक करून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर याचसंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी दिसत आहे आणि तिने मेहनत तर घेतल्याचे लक्षात येत आहे; पण ती परीक्षेत सहजतेने कॉपी करता यावी यासाठी. तिने तिच्या पायांवर अगदी छोट्या छोट्या अक्षरांत काही प्रश्नांची उत्तरे लिहून घेतली आहेत आणि तिने ती तिच्या फूल पँटमध्ये लपवली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
तरुणीचा हा व्हिडीओ @HasnaZaruriHai नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जर मी अभ्यासासाठी इतका वेळ दिला असता तर मी टॉप केले असते. दरम्यान, हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी तरुणीच्या कॉपी करण्याच्या या प्रकारावर आश्चर्य व्यक्त केले आहे; तर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान देशभरातील अनेक राज्यांमध्ये महत्वाच्या परीक्षांमध्येही अनेकदा कॉपीचे प्रकार पाहायला मिळतात. याबाबत शिक्षण विभागाकडून इशारा देऊनही अनेक विद्यार्थी परीक्षेत कॉपी करण्याचे धाडस करतात. त्यामुळे परीक्षेत कॉपी करण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेळोवेळी कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे, त्यामुळे भविष्यात अशा घटना रोखता येतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत.