Haryana Tourists Beaten in Manali Video Viral : हिमाचल प्रदेशातील मनाली या सुंदर अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. पण याच पर्यटनस्थळी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटुंबाबरोबर अतिशय भयानक घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात तो पर्यटक हात जोडून सांगतोय की, पाकिस्तानपेक्षाही मनाली वाईट आहे, त्यामुळे इथे भेट देण्यासाठी येऊ नका. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मनाली येथे पर्यटनासाठी आलेल्या हरियाणातील एका पर्यटक कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. स्कूटी काढण्यावरून झालेल्या वादात या पर्यटक कुटुंबाला तिथल्या लोकांनी मारहाण केली. तसेच त्यानंतर पर्यटक कुटुंबाला पोलिसांकडूनही कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर पर्यटकाने व्हिडीओ शूट करून, तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हे प्रकरण वेगाने व्हायरल होताच पोलिसांनी दखल घेत संबंधित मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मनालीला भेट देणाऱ्या पर्यटकांबरोबर अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मनाली पोलिस ठाण्यात कलम १२६ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) बीएनएसच्या अंतर्गत एफआयआर क्रमांक ९९/२५ दिनांक २३/०६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यटक प्रदीप (३५, रा. सतनाली, महेंद्रगड, हरियाणा) यांच्या तक्रारीवरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रदीपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तो त्याची पत्नी दीपिका (२८), चार महिन्यांची मुलगी जिया, मेव्हणा जैनेंद्र (३६), त्याची पत्नी आशा, भाऊ गोपाल व मेव्हणी निशा यांच्यासह मनालीला पर्यटनासाठी आला होता.

२३ जून रोजी ते सर्व भाड्याने बाईक घेऊन वशिष्ठ येथे गेले. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते मिशन रोडने बाईक देण्यासाठी जात होते. प्रदीप त्याची बाईक चालवत होता. यावेळी त्याच्या मागे पत्नी दीपिका आणि तिच्या मांडीवर बाळ होते. जेव्हा ते एका हॉटेलजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की, एका जीपने संपूर्ण रस्ता अडवला आहे.

पत्नीचा गळा धरला अन् तिच्यासह मुलीला दिले ढकलून

त्यावेळी एका व्यक्तीने प्रदीपकडे बाईकची चावी मागितली; जेणेकरून तो बाईक बाजूला पार्क करू शकेल. पण, त्याला रस्ता न मिळाल्याने त्याने चाव्या परत केल्या आणि त्या व्यक्तीने वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्या व्यक्तीने प्रदीपची पत्नी दीपिका हिचा गळा धरला आणि तिला मुलासह खाली फेकले. त्यामुळे तिच्यासह मुलगाही खाली कोसळला.

प्रदीपचा भाऊ गोपाल त्यांना वाचवण्यासाठी पुढे आला; पण त्यानंतर आणखी ३-४ लोक तिथे आले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी भांडण्यास सुरू केली. त्यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून कारने पळून गेला. पर्यटक कुटुंबाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; पण पोलिसांनी प्रकरण वाढल्यानंतर गुन्हा दाखल केला आणि आता तो तपास अधिकारी मनोज नेगी यांच्याकडे सोपवला आहे.

व्हिडीओत पर्यटक काय म्हणतोय?

तक्रार करणाऱ्या पर्यटकाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो म्हणतोय की, मनाली हे पाकिस्तानपेक्षाही वाईट आहे आणि येथे पर्यटकांसाठी कोणतीही सुरक्षा नसल्याने कोणीही येथे भेट देण्यासाठी येऊ नये. तरुणाने आरोप केला की, तो दोनदा पोलिसांकडे गेला होता; मात्र त्याला कोणीही दाद दिली नाही.