Indian Army Soldiers Viral Video : तुम्ही कोण आहात? कुठे राहता, तुमचं वय काय आहे, काय करता यावरून तुमच्या मनात देशाविषयी किती प्रेम, आदर, सन्मान आहे हे ठरत नाही; तर तुम्ही देशाप्रती कसे व्यक्त होता, सैनिकांविषयी मनात काय भाव ठेवता, कसा आदर करता, यावरून तुमचे देशप्रेम दिसून येते. सध्या याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका चिमुकल्याने जे काही केलं, ते पाहून तुमच्या मनात देशप्रेम वाढेल आणि चिमुकल्याविषयी अभिमान वाटेल.

पाकिस्तानच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकला चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेमुळे सध्या भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढतोय. अशा परिस्थितीत अनेक सैनिक देशाच्या रक्षणासाठी कर्तव्यावर परतताना दिसतायत. ट्रेन, बस, मिळेल त्या सार्वजनिक वाहनांतून ते आपल्या ड्युटीवर रवाना होताना दिसतायत. अशाप्रकारे काही सैनिक ट्रेनमधून प्रवास करत होते. यावेळी एका चिमुकल्याने सैनिकांना पाहताच अशी काही कृती केली की पाहून तुमचीही छाती अभिमानाने भरून येईल. तसेच त्या चिमुकल्यावर चांगले संस्कार करणाऱ्या पालकांचेही तुम्ही कौतुक कराल.

चिमुकल्याच्या निरागसतेने आणि देशभक्तीने जिंकली लोकांचीही मनं

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चिमुकल्याच्या निरागसतेने आणि देशभक्तीने लोकांचीही मनं जिंकली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका ट्रेनच्या डब्यात सर्वात वरच्या म्हणजे अप्पर बर्थवर दोन चिमुकले आरामात बसले आहेत, जे कदाचित त्यांच्या पालकांबरोबर प्रवास करत होते. याचदरम्यान त्या चिमुकल्यांची नजर ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांवर पडते. ते चिमुकले सैनिकांना पाहताच गोड हसतात. यावेळी त्यातील सर्वात लहान चिमुकला सैनिकांप्रती आदर दाखवत चक्क त्यांना सॅल्युट करताना दिसतो.

सैनिकांच्या चेहऱ्यावरही फुलले हास्य

चिमुकल्याचे हे कृत्य पाहून सैनिकांच्या चेहऱ्यावरही हास्य आणि उत्साह फुलतो. चिमुकल्याने इवलुश्या हातांनी केलेलं सॅल्युट आणि दाखवलेला आदर पाहून सैनिकही खूप भारावून जातात. यावेळी एक सैनिक चिमुकल्याच्या सॅल्युटला उत्तर देतो. व्हिडीओमधील हा गोंडस क्षण पाहून लोक चिमुकल्याचे आणि त्याच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या पालकांचे कौतुक करत आहेत.

चिमुकल्याचा हा सुंदर व्हिडीओ @adultsociety नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “या चिमुकल्याने दाखवलेली देशभक्ती कौतुकास्पद आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “त्याच्या पालकांनी त्याला खूप चांगले संस्कार दिले आहेत.” तिसऱ्याने लिहिले, “आपल्या सैनिकांबद्दल इतका आदर पाहून माझी छाती अभिमानाने फुलून आली.”