Kargil Vijay Diwas History & Significance : आजपासून २३ वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वत रांगांवर भारतीय जवानांनी विजयगाथा लिहिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा फडकवला. या दिवशी प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला होता. दरवर्षी २६ जुलै हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. २६ जुलै रोजी, १९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारगिलच्या उंच टेकड्यांवर घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी आपले तळ बनवले होते. भारतीय लष्कराला याची कल्पनाही नव्हती, पण भारतीय जवानांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना हुसकावून लावले आणि कारगिलच्या शिखरांवर तिरंगा फडकवला. जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेल्या पर्वतीय चौक्यांवर नियंत्रण मिळवले तेव्हा कारगिल युद्ध संपले. त्यामुळे कारगिल विजय दिवस हा भारतीय इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतीय वीरांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस देशभरात साजरा केला जातो.

भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.

मानसिक स्वास्थ्यासाठी वार्षिक सुट्ट्या अतिशय आवश्यक; आहेत इतरही अनेक फायदे

१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम…

  • मे ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.
  • मे ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.
  • मे २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
  • मे २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.
  • मे ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.
  • जून १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.
  • जून १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.
  • जून १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली.
  • जून २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.
  • जुलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली.
  • जुलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली.
  • जुलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
  • जुलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला.
  • जुलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

२६ जुलै १९९९ रोजी लष्कराने पाकिस्तानवर भारताचा विजय घोषित केला. तथापि, या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता. कॅप्टन विक्रम बत्रा हे त्या शूर सैनिकांपैकी एक आहेत ज्यांनी देशासाठी लढताना आपले प्राण गमावले. त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलीकडेच, कॅप्टन बत्रा यांच्या जीवनावर आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या शूर योगदानावर शेरशाह नावाचा चित्रपटही बनवण्यात आला आहे.

या दिवशी भारताचे पंतप्रधान इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. देशाला बाहेरील धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी देशभरात उत्सवांचे आयोजन देखील केले जाते. शहीदांच्या कुटुंबीयांचेही स्मृती सभेत स्वागत करण्यात येते. या वर्षी कारगिल विजय दिवसाचा २३ वा वर्धापन दिन असल्याने, युद्ध स्मारकावर ध्वजारोहण समारंभासाठी विशेष कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian soldiers beat pakistan army at 26 july 1999 know the heroic story of kargil vijay diwas pvp