Passenger Travelling In Toilet: ट्रेनमधील प्रवाशांच्या गर्दीचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ट्रेनमधील या भीषण जीवघेण्या गर्दीसंदर्भात क्वचितच काही पावले उचलली जातात, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही; कारण लांबपल्ल्याच्या एकाच नाही तर अनेक ट्रेन्समध्ये सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते. आरक्षित तिकीट असतानाही अनेकांना ट्रेनमध्ये चढायला जागा मिळत नाही. लोक अक्षरश: पायांच्या बोटांवर उभं राहून गर्दीतून लांबपल्ल्याचा प्रवास करतात. अशाच ट्रेनमधील भीषण गर्दीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात गर्दीमुळे काही लोक चक्क ट्रेनच्या बाथरुमध्ये बसून प्रवास करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ४० डिग्री तापमानात लोक अशा गर्दीने खच्चाखच भरलेल्या ट्रेनमधून जीवघेणा प्रवास करतायत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनचा व्हिडीओ शूट करत एक व्यक्ती म्हणते की, मित्रांनो तापमान ४० डिग्री आहे आणि ट्रेनमध्ये गर्दी पाहा. यानंतर तो कॅमेरा ट्रेनच्या बाथरूमच्या खिडकीच्या दिशेने घेऊन जातो आणि तिथे बसलेल्या प्रवाशांना विचारतो की, आत किती लोक बसले आहेत, ज्यावर उत्तर मिळते १०…. यावेळी ते लोक सांगतात की, ही ट्रेन जनसेवा एक्स्प्रेस आहे, जी सहरसा येथून सुटते आणि पुढे अमृतसरहून पंजाबला जाते. हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खचाखच भरलेल्या ट्रेनच्या गेटवर अनेक लोक उभे असल्याचेही दिसत आहेत. काही लोक खिडकीला लटकून बसल्याचे दिसतेय, पण नीट पाहिल्यावर लक्षात येईल की, ते खिडकीत नाही तर ट्रेनच्या टॉयलेटमध्ये बसले आहेत. या टॉयलेटमध्ये एक-दोन नव्हे तर चक्क दहा जण बसले होते.

ज्वेलरी शॉपमध्ये आला, ८४ मिनिटे बसला अन् दागिने लुटून झाला पसार; सराफासमोर घडली चोरीची घटना; video व्हायरल

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोकांकडून अनेक कमेंट येत आहेत. ट्रेनमधील ही वाईट परिस्थिती पाहता कुणी केंद्र सरकारवर, तर कुणी राज्य सरकारवर निशाणा साधत आहे.

जनसेवा नाही जानलेवा एक्स्प्रेस, युजर्सचा संताप

ट्रेनमधील ही परिस्थिती पाहता एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, जर तिकीट व्यवस्थित तपासले गेले तर बहुतेकांकडे तिकिटे नसतील. सरकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेल्वेची ही अवस्था झाली आहे. सरकारने मेट्रो स्थानकांप्रमाणेच रेल्वेस्थानकांवरही तिकीट तपासणीची प्रक्रिया राबवावी आणि परिस्थिती सुधारावी. एकाने लिहिले की, रेल्वेमंत्री हे सर्वसामान्यांसाठी नसून ‘खास लोकांसाठी’ आहेत. सर्व गाड्यांमधील एसएल कोच कमी करून एसी कोचची संख्या वाढवली जात आहे. वंदे भारतसारख्या गाड्या चालवल्या जात आहेत.

आणखी एका युजरने लिहिले की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक राज्य सोडून का जात आहेत, असा प्रश्नही राज्य सरकारला विचारला पाहिजे. एकाने लिहिले की, जर लोकसंख्या नियंत्रणात आणली नाही तर आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. शेवटी एकाने लिहिले की, गाड्यांची संख्या वाढली तरी काही लोक असे आहेत, ज्यांना अशा प्रकारे प्रवास करण्याची सवय आहे, त्यांचे काहीही होऊ शकत नाही.