जेव्हा दुकानातून आपण काही वस्तू खरेदी करतो, तेव्हा दुकानदार सुट्टे पैसे देण्यास चिडचिड करतात. काही दुकानदार यावेळी सुट्ट्या पैश्यांऐवजी चॉकलेट देतात, तर काही सरळ सुट्टे पैसे परत देण्यास नकार देतात. अशाप्रकारे अनेक मुजोर दुकानदार सुट्टे पैशांच्या नावाखाली अनेक ग्राहकांची लूट करताना दिसतात. असेच एक प्रकरण ओडिशामधून समोर आले आहे, जे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला यापुढे दुकानदाराकडून तुमचे सुट्टे पैसे मागण्याची भीती किंवा लाज वाटणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक ग्राहक फोटोकॉपी काढण्यासाठी संबळपूरला गेला होता. यावेळी एका कॉपीसाठी त्याला दोन रुपये खर्च आला म्हणून त्याने दुकानदाराला पाच रुपये दिले. मात्र, उरलेले तीन रुपये मागितल्यावर दुकानदार त्याच्याशी उद्धटपणे बोलला. यावेळी ग्राहकाने सर्व गोष्टी ऐकून घेत नंतर दुकानदाराविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. यानंतर न्यायालयाने दुकानदाराला २५ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहे

नेमकं प्रकरण काय आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार संबलपूर जिल्ह्यातील बुधराजा भागात राहणारा प्रफुल्ल दास २८ एप्रिल रोजी झेरॉक्सच्या दुकानात डॉक्युमेंटची फोटोकॉपी घेण्यासाठी गेला होता. यावेळी एका कॉपीची किंमत दोन रुपये होती, म्हणून त्याने दुकानदाराला पाच रुपये दिले. कायद्यानुसार दुकानदाराने दोन रुपये घेत उरलेले तीन रुपये परत करायला हवे होते. मात्र, दुकानदाराने उर्वरित पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी प्रफुल्ल यांनी वारंवार आपले उर्वरित पैसे मागण्याचा प्रयत्न केला, पण दुकानदाराने त्यांना शिवीगाळ करत पैसे परत करण्यास नकार दिला. यावेळी संतापलेल्या प्रफुल्ल यांनी ग्राहक न्यायालयात दुकानदाराविरुद्ध दावा दाखल केला.

दंड वेळेत न भरल्यास आकारले जाणार ९ टक्के व्याज

या प्रकरणावर २६ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली. यावेळी ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’ने एक आदेश दिला. या आदेशानुसार, आरोपीला तक्रारदाराकडून झेरॉक्स फी म्हणून घेतलेले तीन रुपये आणि मानसिक त्रास देत छळ केला त्याची भरपाई म्हणून दुकानदाराने ३० दिवसांच्या आत तक्रारदाराला २५ हजार रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय दुकानमालकाने दिलेल्या मुदतीत दंड न भरल्यास या रकमेवर दरवर्षी ९ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या निर्णयात न्यायालयाने ग्राहकांचे हक्क अबाधित ठेवण्याच्या आणि व्यावसायिक व्यवहारांमध्ये निष्पक्ष व्यवहार सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jago grahak jago sambalpur xerox shop owner fined 25000 rupees for not returning 3 rupees after photocopy in odisha sjr