Tiger Attack Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक हादरवून टाकणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका तरुणाने जंगलाच्या काठावर ‘सेल्फी’ घेण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि पुढच्याच क्षणी त्याच्यावर भयंकर वाघाने झेप घेतली. एका क्षणात सगळं इतकं वेगानं घडलं की पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा आला.
‘सेल्फी’साठी जंगलात उतरला आणि वाघाच्या नजरेत भरला…
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रसंग एका जंगलाच्या सीमेजवळ घडला. एक तरुण हरणाच्या अगदी जवळ उभा राहून मोबाईलवर व्हिडीओ शूट करत होता. त्याच्यासोबत असलेला मित्र कारमध्ये बसून हे सर्व रेकॉर्ड करत होता. हरणाच्या पाठीमागील हिरव्या झाडीतून येणारा वारा, शांत वातावरण सगळं परिपूर्ण वाटत होतं… पण, त्याच क्षणी झुडपांमधून काहीतरी हललं आणि पुढच्याच सेकंदात एका रौद्र वाघाने वेगाने त्या तरुणाकडे धाव घेतली.
क्षणात उलटला जीवाचा खेळ
वाघाचा झपाटा इतका जबरदस्त होता की पाहणाऱ्यांनाही काही समजलं नाही. तरुणाने कशीबशी वेळेवर पलटी मारत स्वतःला वाचवलं. त्याच्या ओरडण्याचा आवाज, गाडीतील लोकांची किंकाळी आणि वाघाची गर्जना सगळं एकाच वेळी घडलं. कारमध्ये बसलेले लोकसुद्धा थरारून गेले आणि लगेच गाडी मागे घेतली. काही क्षणांसाठी सगळं थांबलं आणि त्यानंतर व्हिडीओ थांबतो…
व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
या घटनेची छोटीशी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर काही तासांतच हजारो वेळा शेअर झाली आहे. पाहणारे लोक एकच प्रश्न विचारतायत, “फक्त एका व्हिडीओसाठी कोणी एवढा धोका का पत्करतो?” या घटनेनंतर वनविभाग आणि वन्यजीवप्रेमी लोकांनीही इशारा दिला आहे की, जंगल म्हणजे पर्यटनस्थळ नाही, तर जिवंत प्राण्यांचं घर आहे. नियम मोडल्यास किंमत जीवाने मोजावी लागू शकते.
निसर्गासोबत खेळणे म्हणजे आगीशी खेळणे
या व्हिडीओमधून एकच गोष्ट स्पष्ट होते, ‘सेल्फी’च्या नादात जीवाशी खेळू नका! जंगलातील प्राणी शांत दिसले तरी ते क्षणात हल्ला करू शकतात. जंगलातील प्रत्येक प्राणी आपला हक्काचा परिसर सांभाळतो. अशा वेळी आपली थोडीशी चूकही जीवावर बेतू शकते.
शेवटी एकच संदेश, निसर्गाचं सौंदर्य कॅमेऱ्यात नाही, अंतरात आहे. जंगलाचं सौंदर्य डोळ्यांनी पाहावं, पण त्याचं उल्लंघन करू नये. थोडक्यात, वाघाची गर्जना फक्त चित्रपटातच नाही, तर निसर्गातही प्राणघातक ठरू शकते.
