Maratha Andolan Thar Car Viral Video: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, महाराष्ट्राच्या राजधानीत आंदोलनाचं वादळ उसळलं आहे. आझाद मैदान, मंत्रालय, सीएसएमटी – सगळीकडे भगव्या झेंड्यांचा समुद्र उसळला आहे. दूरदूरवरून आलेल्या मराठा बांधवांच्या घोषणा, जल्लोष व गगनभेदी आवाज यांनी संपूर्ण मुंबई दणाणून गेली आहे. कुणबी नोंदींसह मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून हजारो लोक त्यांच्याबरोबर मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबईत दोन दिवसांपासून एकच खळबळ माजली आहे… आझाद मैदान, सीएसएमटी रेल्वेस्थानक, मंत्रालय परिसर – सर्वत्र भगव्यांचा महासागर उसळला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले आणि संपूर्ण वातावरण थरारून गेलं. कुठे घोषणांचा गजर, कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू – अशा संमिश्र भावनांनी भरलेलं हे आंदोलन आता सर्वांचं लक्ष वेधून घेतंय.

या सगळ्या आंदोलनात एक व्हिडीओ मात्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आंदोलकांच्या ताफ्यात आलेल्या एका थार गाडीनं अचानक रस्त्यावर थरार निर्माण केला. गाडी थांबली आणि काही क्षणात चालकानं गाडी नाचवायला सुरुवात केली. पाहता पाहता, रस्त्यावर जल्लोष उसळला, लोकांच्या घोषणा दणाणल्या, तर हातातल्या भगव्या झेंड्यांनी आकाश गाजवलं. ही थार नाचवतानाचा व्हिडीओ इतका वेगानं व्हायरल होतोय की, तो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय.

पण, गोष्ट एवढ्यावरच थांबलेली नाही, तर या आंदोलनात एक वेगळाच प्रसंग घडला. आंदोलनात सहभागी झालेल्या एका मुस्लीम बांधवानं हातात फलक घेतला होता– “मी महाराष्ट्राचा मुसलमान. मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे!” त्यानं पाऊल टाकताच संपूर्ण गर्दी त्याच्याभोवती जमा झाली. मराठा बांधवांनी त्याला खांद्यावर उचलून जल्लोष केला. ते दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले; तर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनानं राज्यातील राजकारणालाही हादरे दिले आहेत. “मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं,” या ठाम मागणीवर आंदोलक ठाम आहेत. आंदोलकांचे म्हणणं आहे की, सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा; अन्यथा संघर्ष आणखी तीव्र होईल.

येथे पाहा व्हिडीओ

मुंबईच्या रस्त्यांवर उसळलेलं हे भगवं वादळ फक्त मराठा बांधवांचंच नाही, तर महाराष्ट्राच्या एकतेचं दर्शन घडवतंय. आंदोलनातील थार गाडीचा जल्लोष, मुस्लीम बांधवांची अभिमानानं केलेली घोषणा आणि आझाद मैदानात सुरू असलेलं उपोषण – या सगळ्यामुळे महाराष्ट्रात आज एक वेगळाच उत्साह आणि थरार जाणवतोय.