Navratri 2025 Durga Mata: नवरात्रीत विविध ठिकाणी देवी आईचे आगमन होते. घरगुती असो वा सार्वजनिक मंडळ सगळीकडे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. तेच पश्चिम बंगालमध्ये दु्र्गा मातेच्या आगमनाला मोठं महत्त्व आहे. त्यातच यासाठी केलेली आरासही लोकांचं लक्ष वेधून घेते. अशाच एका देखाव्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पश्चिम बंगलाच्या खागरा स्मशानभूमी घाट इथल्या दुर्गा पूजा समितीच्या दुर्गा पूजा मंडळात राजकीय आणि सामाजिक संदेशाचे एक अनोखे दृश्य दाखवले गेले. सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

हा देखाव्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असुर म्हणून दाखवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनशी मजबूत संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असूनही ट्रम्प यांनी विश्वासघात केला. हे चित्रण ट्रम्प यांनी भारताशी केलेला विश्वासघात दर्शवते असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कलाकार असीम पाल यांनी बनवलेल्या या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयोजक आणि मंडप अधिकाऱ्यांनी सांगितले की, या थीममागील प्रेरणा डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या व्यापार धोरणांमधून आली आहे, त्यामुळे भारताला आर्थिक नुकसान झाले आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आयोजकांनी सांगितले की, ट्रम्प यांनी आमच्यावर लादलेल्या पन्नास टक्के कराला प्रतिसाद म्हणून आम्ही ही थीम साकारली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र मानणारे आमचे मोदी यांना त्यांनी फसवले हे दाखवण्यासाठी आम्ही ट्रम्प यांना राक्षस म्हणून चित्रित केले आहे. यासाठी आम्हाला स्थानिक समुदाय आणि लोकांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क इथे बंगाल क्लब ९०वी दुर्गा पूजा साजरी करत आहे. मे महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा देखावा त्यांनी उभारला आहे.