नोटबंदीच्या निर्णयावरुन विरोधकांनी संसद दणाणून सोडली आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून विरोधकांनी संसदेत सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. हिवाळी अधिवेशन सुरू होऊन १८ दिवस झाले आहेत. मात्र संसदेत एकही दिवस नीट कामकाज होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत नोटाबंदीविषयी अद्याप काहीच बोललेले नाहीत. त्यामुळेच आता ट्विटरवर अनेकांनी मोदींनी संसदेत यावे आणि बोलावे, अशी मागणी केली आहे. तर काहींनी सभांमध्ये भाषण करणाऱ्या मात्र संसदेत काहीच न बोलणाऱ्या पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे.

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी यांनी संसदेत येऊन सभागृहाला संबोधित करावे, अशी मागणी करत आहेत. मोदींनी संसदेत येऊन चर्चेत सहभाग घ्यावा आणि विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी विरोधकांकडून केली जाते आहे. मात्र संसदेत बोलत नसल्याने ट्विटरवर अनेकांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

‘पंतप्रधान लोकसभेत यायला घाबरत आहेत. त्यांनी संसदेत येऊन संवाद साधावा,’ असे काही दिवसांपूर्वीच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते. तेव्हापासून ट्विटरसह समाज माध्यमांवर ‘डरपोक फेकू हाजीर हो’ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. सोमवारी अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले.

काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या मौनावर जोरदार टीका करायचे. मात्र आता तशाच प्रकारच्या टिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामोरे जावे लागत आहे. काहींनी मोदींवर टीका करण्यासाठी शेर शायरीचा आधार घेतला आहे. ‘तू कहता है कि देश तुझ पे मरता है, फिर संसद में आने से तू क्यूं डरता है,’ असे म्हणत एका ट्विटर वापरकर्त्याने मोदींवर ट्विप्पणी केली आहे. तर दुसऱ्या एका ट्विटर वापरकर्त्याने ‘तुम इतना रॅलियो में बडबडा रहे हो, क्या डर है जो संसद में आने से घबरा रहे हो?’, असा प्रश्न मोदींना विचारला आहे.

 

https://twitter.com/desiindian420/status/808216215294312448

https://twitter.com/AhtshamWrites/status/808227891477680128

अशोक गौर नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने ‘मोदीजी, संसदेत ३५० पेक्षा अधिक खासदार असूनही तुम्ही बोलू दिले जात नाही म्हणता हे तर कमकुवत पंतप्रधान असल्याचे लक्षण आहे,’ असे म्हणत मोदींची खिल्ली उडवली आहे.