Russian Kids Dance Bollywood Song: बॉलीवूडची जादू जगभर पसरल्याचं आपण ऐकत आलोच आहोत; पण हे जेव्हा प्रत्यक्षात पाहायला मिळतं तेव्हा मन भारावून जातं. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो भारताबाहेरही आपल्या संस्कृतीची छाप किती खोलवर पडली आहे, याचा उत्तम पुरावा आहे.

स्टेजवर अचानक लाल रंगाच्या लेहंग्यांमध्ये काही चिमुकल्या मुली प्रवेश करतात. पार्श्वभूमीला सुरू होतो एक ओळखीचा सूर ‘चंदा चमके चम चम’. पण बघता बघता आपल्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात. कारण- हा परफॉर्मन्स भारतातला नसून, रशियामधला आहे. या रशियन मुलींच्या डान्सनं इंटरनेटवर इतका जबरदस्त धुमाकूळ घातलाय की, लोक भावूक झालेत, त्यांचे डोळे पाणावलेत, आणि एकच उद्गार निघतोय, कला आणि ममता कुठेही सीमित नाहीत.

रशियातील काही चिमुकल्या मुलींनी ‘फना’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘चंदा चमके चम चम’वर असा काही मनोवेधक डान्स सादर केलाय की, सोशल मीडियावर अक्षरशः तुफान आलंय. Instagram युजर Adinka Mandarinka ने शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २.३ कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या गाण्यावर स्टेजवर येताना मुलींनी परिधान केलेले लाल रंगाचे लेहंगे, त्यांचे ते सामूहिक सुसंगत नृत्य, प्रत्येक तालावरच्या अचूक हालचाली आणि प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे भारतीय पद्धतीचे हावभाव हे सगळं पाहून वाटतंय की, जणू हे नृत्य म्हणजे कोणत्या तरी भारतीय शाळेतील कार्यक्रमाचा हा भाग आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे नृत्याचं हे सादरीकरण रशियात झालं आहे.

नृत्य सादरीकरणाच्या वेळी लोकांच्या आणखी एक विशेष गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे कॅमेरामन. स्टेजच्या चारही बाजूंनी फिरत, विविध कोनांतून व्हिडीओ शूट करणारी ती व्यक्ती इतकी मेहनतीने कॅमेरा हलवत होती की अनेक युजर्सनी त्यालाही सुपरस्टार ठरवलं. “कॅमेरामॅनला तर ऑस्कर द्या!”, असंही एका युजरनं लिहिलंय.

हा व्हिडीओ केवळ एक डान्स नाही, तर तो भारत-रशिया सांस्कृतिक मैत्रीचा सुंदर नमुना आहे. राज कपूर, मिथुन चक्रवर्तीपासून रणवीर सिंहपर्यंत भारतीय सिनेमांवर रशियन लोकांनी कायम प्रेम केलं आहे.

येथे पाहा व्हिडीओ

या गाण्यावर रशियन मुलींनी दिलेला परफॉर्मन्स पुन्हा एकदा सिद्ध करतो की, कला, संगीत आणि संस्कृतीला कुठलीच सीमा नसते. भारताचा देसी स्वॅग आता जगभर गाजतोय आणि त्याचं हे सर्वांत गोड उदाहरण आहे रशियातल्या छोट्या भारत कन्यांचा चमचमता डान्स!