Beauty Salon Shocking Incident: सोशल मीडियावर सध्या एक हादरवणारा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक झाले आहेत. नेहमीप्रमाणे एक महिला हेअर सलूनमध्ये बसून आरामात हेअर स्टाइलिंग करून घेत होती. हातात हेअर ड्रायर होता, सर्व काही अगदी नेहमीसारखं शांत आणि सामान्य सुरू होतं. पण, काही क्षणातच असं काही घडलं की उपस्थित सगळ्यांचेच हृदय जोरात धडधडू लागलं.

अचानक उडाल्या ठिणग्या

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की महिला ड्रायरने केस सेट करत असतानाच अचानक त्यातून धूर आणि ठिणग्या (स्पार्क्स) निघू लागतात. क्षणभरातच मशीनमध्ये आग लागते. काही कळायच्या आतच परिस्थिती गंभीर होऊ शकली असती, पण महिलेनं प्रसंगावधान दाखवत क्षणाचाही विलंब न करता तो ड्रायर हातातून फेकून दिला. हा निर्णय तिच्या जीवासाठी वरदानच ठरला.

मोठा अपघात टळला

ड्रायर पूर्णपणे पेट घेताना व्हिडीओमध्ये दिसतं. जर त्या महिलेनं थोडाही उशीर केला असता, तर मोठा स्फोट होऊन तिचं गंभीर नुकसान झालं असतं. काही सेकंदात जीव धोक्यात घालणारा प्रसंग निर्माण झाला होता, मात्र ती सुदैवाने वाचली आणि मोठा अपघात टळला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अशाचप्रकारे हेअर ड्रायरमुळे झालेल्या अनेक घटना दाखवल्या गेल्या आहेत.

युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वणव्याप्रमाणे पसरत आहे. अनेकांनी हा प्रकार “लापरवाहीचा नमुना” असल्याचं म्हटलं तर काहींनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा योग्य वापर व देखभाल किती महत्त्वाची आहे यावर भर दिला. काही युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या, “ब्युटी ट्रीटमेंटसोबत फायर शो फ्रीमध्ये!” असं लिहिणारेही होते, तर अनेकांनी महिलेनं दाखवलेल्या प्रसंगावधानाची जोरदार प्रशंसा केली.

असा प्रकार का घडतो?

तज्ज्ञ सांगतात की अशा घटना साधारणतः निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर किंवा त्यांचा जास्त वेळ सलग वापर केल्यामुळे होतात. हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लर यांसारखी साधनं मोठ्या प्रमाणात वीज वापरतात, त्यामुळे त्यांचा वापर करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. प्लग, वायरिंग व्यवस्थित आहे का याची खात्री करणं आणि वेळोवेळी उपकरणांची तपासणी करणं हे अत्यावश्यक आहे.

येथे पाहा व्हिडीओ

सावधानतेचा इशारा

या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की रोज वापरणाऱ्या गॅझेट्सकडे आपण हलगर्जीपणे पाहू नये, कारण छोटीशी चूक कधी मोठ्या अपघाताचं कारण बनते हे या व्हिडीओनं दाखवून दिलं आहे. सध्या तरी महिला सुरक्षित आहे, हीच सर्वात मोठी दिलासा देणारी गोष्ट.