Shocking Video Viral: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याचा गळा एका खिडकीत अडकल्याचे दिसतेय.

व्हिडीओत आपण पाहू शकतो की, तो खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. खरं तर शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी त्याला वर्गातच ठेवले होते. गावकरी व स्थानिक लोकांनी त्या मुलाला वाचवले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याची सुटका झाली. या घटनेमुळे शाळेच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कारण- विद्यार्थी झोपलेला असताना शिक्षकांनी त्याला वर्गातच सोडले आणि शाळेचे दरवाजे बंद करून ते निघून गेले.

व्हायरल व्हिडीओ (Shocking Video Viral)

FPJच्या वृत्तानुसार ही घटना कटिहारच्या प्राथमिक शाळेतील आहे, जी ताजगंज फसिया वॉर्ड क्रमांक ४५ मध्ये आहे. मंगळवारी गौरव कुमार नावाचा सात वर्षांचा विद्यार्थी, जो तिसऱ्या इयत्तेत शिकतो, तो शाळेतील वर्गाच्या खिडकीत अडकला. शाळा बंद असल्यामुळे तो खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. माहितीप्रमाणे, शाळा दुपारी ४ वाजता सुटली होती. नेहमीप्रमाणे सर्व मुले, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापक शाळेचे दरवाजे बंद करून निघून गेले; पण गौरव वर्गात झोपलेला होता.

विद्यार्थी जागा होताच त्याने पाहिले की, वर्गाचे दार बंद आहे. तो खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा गळा खिडकीत अडकला. माहितीप्रमाणे, तो सुमारे एक तास तिथे अडकलेला होता.

योगायोगाने, शाळेजवळ काही मुले क्रिकेट खेळत होती. जेव्हा त्यांनी गौरवच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ते चेंडू आणण्यासाठी शाळेच्या आत आले. त्यांनी लगेच जवळच्या गावकऱ्यांना सांगितले. काही गावकरी शाळेजवळ जमा झाले आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत गेले. नंतर त्या मुलाची सुटका करण्यात आली.

या घटनेमुळे शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी किती आहे यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण- त्यांनी मुलाला वर्गातच सोडले आणि सर्व दरवाजे बंद करून ते गेले. जरी विद्यार्थी वर्गात झोपलेला असला तरी त्याला उठवून सुरक्षितपणे घरी पाठवणे ही शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @BIHAR39 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.