Auto India News: भारतीय कार बाजारात एका लोकप्रिय ब्रँडने आपल्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त असा एक भन्नाट निर्णय घेतला आहे, की गाड्यांचे चाहते अक्षरशः आनंदून जातील. जागतिक स्तरावर १३० वर्षांचा आणि भारतात तब्बल २५ वर्षांचा प्रवास पूर्ण करणाऱ्या एका नामांकित परदेशी कार ब्रँडने भारतीय बाजारपेठेत तीन धडाकेबाज कार्सच्या लिमिटेड एडिशन मॉडेल्स सादर केल्या आहेत. ही संधी फार कमी लोकांनाच मिळणार आहे. कारण- प्रत्येक मॉडेलच्या फक्त ५०० गाड्याच तयार करण्यात येणार आहेत. फक्त ५०० भाग्यवान ग्राहकांनाच या खास SUV मिळणार असून, तिचे डिझाईन, कलर कॉम्बिनेशन व फीचर्स पाहून कोणीही प्रेमात पडेल.
या स्कोडा’च्या स्पेशल एडिशनमध्ये SUV कुशाक, मिडसाईझ सेडान स्लाविया व SUV कायलाकचा समावेश आहे. प्रत्येक गाडीला केवळ बाह्य रूपच नव्हे, तर फीचर्समध्येही खास अपडेट मिळाले आहे. आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक लिमिटेड एडिशन गाडीसोबत फ्री अॅक्सेसरीज किट मिळणार आहे, ज्यात ३६०-डिग्री कॅमेरा सेटअप, पॅडल लॅम्प्स, अंडरबॉडी लाइट्स व बी-पिलरवर २५ व्या वर्धापनदिनाचा खास बॅज आहे.
Kushaq Monte Carlo limited edition
ही SUV डीप ब्लॅक आणि टोर्नेडो रेड या दोन आकर्षक रंगांत उपलब्ध असून, विरोधी रंगातील अॅक्सेसरीजमुळे तिचा लूक आणखीनच उठून दिसतो. फॉग लॅम्प गार्निश, ट्रंक गार्निश, लोअर डोअर गार्निश व स्पोर्टी फिन स्पॉयलर यांमुळे रस्त्यावर तिची वेगळीच ओळख तयार होते.
Slavia Monte Carlo limited edition
ही मिडसाईझ सेडान स्पोर्टी स्टाइलिंगसह येते. काळा व लाल अशा दोन रंगांच्या पर्यायात ती उपलब्ध असून, फ्रंट बंपर स्पॉयलर, ट्रंक गार्निश व लोअर डोअर गार्निश हे विशेष आकर्षण आहे. ड्रायव्हिंगचा अनुभव वाढवण्यासाठी फ्री अॅक्सेसरीज किटही यात दिलं जातं.
Kylaq limited edition
कायलाक SUV सिग्नेचर+ व प्रेस्टीज या मॉडेल्सवर आधारित असून, सात रंगांच्या पर्यायात ती उपलब्ध आहे. त्यामध्येही फ्री अॅक्सेसरीज किट व खास २५ व्या वर्धापनदिनाचा बॅज दिला जातो.
कंपनीचे ब्रँड डायरेक्टर आशीष गुप्ता यांच्या मते, या तीनही गाड्या स्पोर्टी लूक, प्रीमियम फीचर्स व स्मार्ट इनोव्हेशनचं परफेक्ट मिश्रण आहेत, ज्यामुळे ‘स्कोडा’च्या चाहत्यांना एक वेगळा अनुभव मिळेल.
पण प्रश्न असा की, या गाड्यांची किंमत किती आहे? तर खुलासा असा
कुशाक एडिशन : सुरुवात १६.३९ रुपये लाखांपासून
स्लाविया एडिशन: सुरुवात १५.६३ रुपये लाखांपासून
कायलाक एडिशन : सुरुवात ११.२५ रुपये लाखांपासून….