Tata Motors Upcoming Cars: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात पुन्हा एकदा Tata Motors मोठा धमाका करणार आहे. आतापर्यंत आपल्या दमदार डिझेल इंजिनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टाटा कंपनीने आता आपलं लक्ष नव्या पेट्रोल इंजिन SUV रेंजकडे वळवलं आहे आणि ही बातमी समजताच ऑटोप्रेमींची उत्सुकता अक्षरशः शिगेला पोहोचली आहे. सध्या टाटा मोटर्सच्या प्रमुख SUV म्हणजेच Harrier आणि Safari या दोन्ही गाड्या केवळ २.० लिटर मल्टिजेट डिझेल इंजिनवर चालतात. पण, पेट्रोल इंजिनचा पर्याय नसल्याने Kia, Hyundai आणि MG सारख्या प्रतिस्पर्ध्यांना थोडं वरचढ ठरताना पाहिलं जातं.
मात्र, आता खेळ बदलणार आहे! कारण टाटा मोटर्सची दीर्घ प्रतीक्षेत असलेली १.५ लिटर tGDi टर्बो पेट्रोल इंजिन मार्च २०२६ पर्यंत बाजारात उतरण्याची शक्यता आहे. हे इंजिन १६८ bhp पॉवर आणि २८० Nm टॉर्क निर्माण करणार असल्याचं समजतं. चला तर जाणून घेऊयात या कारमध्ये काय असेल खास, जबरदस्त फिचर्स जाणून घेऊयात…
काय असेल या इंजिनची खासियत?
टाटा मोटर्सचं हे नवं पेट्रोल इंजिन पूर्णपणे इन-हाऊस विकसित केलं गेलं आहे. यात ७-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स तसेच ६-स्पीड मॅन्युअल पर्याय देण्यात येईल. सर्वात खास बाब म्हणजे, या इंजिनचे वेगवेगळे ट्यूनिंग व्हर्जन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये वापरले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक SUV मध्ये वेगळी परफॉर्मन्स लेव्हल मिळेल.
कोणत्या SUV मध्ये मिळणार हे इंजिन?
सर्वप्रथम या इंजिनचा लाभ मिळणार आहे Harrier आणि Safari या दोन फ्लॅगशिप मॉडेल्सना. यानंतर हीच पॉवर युनिट आगामी Sierra SUV मध्येही वापरली जाणार आहे. सिएरा हा टाटाचा ‘आयकॉनिक मॉडेल’ असल्याने त्याचं री-लाँच आधीपासूनच चर्चेत आहे. अलीकडेच या तिन्ही SUV च्या पेट्रोल इंजिन टेस्ट म्यूल्स भारतात पाहण्यात आले आहेत.
किंमत आणि बाजारातील स्थान
हे इंजिन देशातच विकसित झाल्यामुळे पेट्रोल व्हर्जनची किंमत सध्याच्या डिझेल मॉडेलपेक्षा जवळपास एक लाख रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे किफायतशीर किंमत, कमी मेंटेनन्स आणि जास्त मायलेज हे घटक टाटाच्या SUV ला नव्या उंचीवर नेतील. थोडक्यात सांगायचं तर २०२६ हे वर्ष टाटा SUV प्रेमींसाठी ‘गेम-चेंजर’ ठरणार आहे. Harrier, Safari आणि Sierra या नव्या पेट्रोल अवतारात दिसल्यावर रस्त्यावर पुन्हा एकदा ‘Made in India’ ची ताकद गरजताना ऐकू येईल.