रस्त्याने वाहन चालवताना काही वेळा इतरांच्या चुकीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागतो. अशाच प्रकारे तेलंगणातील रस्त्यावर एक संतापजनक घटना घडली आहे. जिथे भर ट्रॅफिकमध्ये प्रवास करताना एक बाइकस्वार खोडकरपणे कारच्या डिकीवर हाताने जोरात मारताना दिसला. बाइकस्वाराच्या या कृत्यामुळे कारचालकाला खूप राग येतो आणि तो त्याला धडा शिकवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध कार उभी करतो. त्यानंतर चालक कारमधून खाली उतरून, रागाच्या भरात डिकीमधून एक लाकडी दांडा काढून बाइकस्वाराला मारण्यास सुरुवात करतो. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुसऱ्या एका कारच्या डॅश कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली आहे. ही घटन सप्टेंबरमध्ये घडल्याचे म्हटले जात आहे; पण त्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये एक बाइकस्वार घाईघाईत दोन कारच्या मधून जाण्याचा प्रयत्न करीत असतो; पण यातील एक कार ट्रॅफिक सुटल्याने पटकन पुढे निघून जाते. त्यामुळे बाइकस्वाराचा बॅलन्स बिघडतो आणि मग तो कसाबसा सावरत पुढे जातो. ज्या कारमुळे त्याचा बॅलन्स बिघडला, त्या कारच्या ट्रंकवर तो हाताने जोरात मारतो.

त्यानंतर संतापलेला कारचालक भररस्त्यात कार थांबवतो आणि डिकीमधील एक काठी काढून बाइकस्वाराला मारहाण करू लागतो. तो रागाच्या भरात बाइकवरही काठीने मारू लागतो आणि बाइकस्वाराच्या कानाखाली मारतो. यावेळी बाइकस्वार निमूटपणे सर्व मारहाण सहन करीत उभा राहतो. अखेर काही मिनिटांनी कारचालक शांत होतो आणि इतर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कार रस्त्याच्या पलीकडे नेऊन उभी करतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana road rage caught on dashcam biker repeatedly bangs car trunk angry driver steps out to hit man with stick sjr